सॅमसंगनंतर मोटोरोला कंपनीही फोल्डेबल फोनच्या सेगमेंटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. कंपनी 13 नोव्हेंबर रोजी कॅलिफॉर्नियात एका इव्हेंटमध्ये आपला फोल्डेबल फोन Motorola RAZR लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच कंपनीच्या Moto Razr या एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन होईल. कंपनी हा फोन Razr 2019 नावाने लाँच करण्याची शक्यता आहे.

कंपनीने या इव्हेंटसाठी माध्यमांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात केली असून मीडिया इन्वहाइट्समध्ये फोनचा GIF शेअर करण्यात आला आहे. यात फोन फोल्ड आणि अनफोल्ड होताना दाखवला आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच मोटोरोलाचे उपाध्यक्ष(ग्लोबल प्रोडक्ट्स) डॅन कॅरी यांनी फोल्डेबल फोन्सच्या योजनेबाबत इशारा दिला होता. एका मुलाखतीत त्यांनी फोल्डेबल फोनच्या निर्मितीवर कंपनीकडून बऱ्याच दिवसांपासून काम सपरू होतं असं सांगितलं. सॅमसंग किंवा Huawei या कंपन्यांची स्टाइल कॉपी न करता स्वतःच्या वेगळ्या स्टाइलमध्ये नव्या प्रकारचा फोल्डेबल फोन असेल असंही ते म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये Razr 2019 डिसेंबर 2019 किंवा जानेवारी 2020 मध्ये युरोपिय बाजारात ( किंमत – 1,500 युरो ,जवळपास 1,19,000 रुपये) उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. Razr 2019 सहा जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 710 एसओसी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसंच 6.2 इंचाचा मुख्य डिस्प्ले (876×2142 पिक्सेल रिझोल्युशन) असेल आणि 600×800 पिक्सल रिझोल्युशनचा सेकंडरी डिस्प्ले असू शकतो.