दिवाळी संपली की वेध लागतात नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनचे. हे सेलिब्रेशन घरी करण्यापेक्षा बाहेरगावी जाणेच अनेक जण पसंत करतात. या काळात असणारे उत्तम हवामान आणि सुट्ट्या यांचे निमित्त साधून कौटुंबिक किंवा मित्रमंडळींच्या सहलींचे आयोजन केले जाते. बाहेरगावी गेल्यावर राहण्यासाठी हॉटेल शोधणे हे एक जोखमीचे आणि खर्चाचे काम असते. यासाठीच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेटं कॉर्पोरेशनतर्फे (MTDC) रिसॉर्टची सोय राज्यभरात सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. नाताळ आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातील नागरिकांनी MTDC च्या रिसॉर्टला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे चित्र आहे. जवळपास महिनाभर आधीच राज्यातील सर्व MTDC रिसॉर्टचे बुकींग फुल्ल झाले आहे.

यामध्येही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असलेल्या MTDC रिसॉर्टला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. यातही कोकणातील रिसॉर्ट आघाडीवर आहेत. गणपतीपुळे, तारकर्ली, वेळणेश्वर, हरीहरेश्वर, याठिकाणी आताच १०० टक्के बुकींग झाले आहे. तर नागपूर आणि महाबळेश्वर याठिकाणचे रिसॉर्टही १०० टक्के फुल्ल झाले आहेत. त्याशिवाय कुणकेश्वर आणि शिर्डी याठिकाणीही ९० टक्क्यांहून अधिक जणांनी बुकींग केले आहे. याबाबत सांगताना एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे म्हणाले, पर्यटकांना सध्या नैसर्गिक वातावरण मिळेल अशाठिकाणी रिलॅक्स होणे आवडते. आता नाताळ आणि न्यू इयर आल्याने कोकणातील विविध ठिकाणांच्या रिसॉर्टचे वेगाने बुकींग झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे हे रिसॉर्ट शहरापासून दूर आणि नैसर्गिक वातावरणात असतील असा आमचा प्रयत्न आहे. तसेच बाहेर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.