रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे कायमच आकर्षक सुविधा देऊन ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. मोफत इंटरनेट सुविधेनंतर आता कंपनी आपला मोबाईलही बाजारात आणणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. येत्या २१ जुलै रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजित असून यादिवशी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपल्या नवीन उत्पादनाची घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकताच कंपनीतर्फे लाँच करण्यात येणारा ४ जी वोल्ट मॉडेलचा फोटो लीक झाला होता. तर लीक झालेला हा फोन प्रत्यक्षात लाँच होणार आहे का याबाबत मोबाईल क्षेत्रात चर्चा आहे. या नव्याने लाँच होणाऱ्या फोनची किंमत ५०० रुपयांहून कमी असल्याची चर्चा होती मात्र हा फोन १५०० रुपयांहून कमी किंमतीचा असेल. या फोनची किंमत इतकी कमी असल्याने जिओला मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यावी लागणार आहे.

जिओ Lyf ब्रँडच्या या फोनचे फोटो लीक झाले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ५१२ एमबी रॅम, ४ जीबी इंटरनल स्टोअरेज, ड्युएल सीम, नॅनो सीमकार्ड सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये आहेत. विविध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार २ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेराही या फोनमध्ये असणार आहे. techPP ने रिलायन्स फोनचे फोटो शेअर केलेत. टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जिओ प्रत्येक फोनमागे ६५० ते ९७५ रुपये सबसिडी देणार असल्याचेही बोलले जात आहे. अशाप्रकारे स्वस्तातील फिचर फोन लाँच करुन जिओ आपल्या अॅक्टीव्ह यूजर्सची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.

काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ डीएटीएच सेवा लाँच करणार असंही म्हटलं जात होतं. मात्र त्याबाबतही कोणतीच खात्रीशीर माहिती रिलायन्स समूहाकडून देण्यात आलेली नाही. रिलायन्सकडून कायमच आपल्या नव्याने येणाऱ्या उत्पादनांबाबतची उत्सुकता ताणून ठेवते. मात्र जुलैच्या अखेरीस जिओचा हा नवा फोन बाजारात आल्यास तो मोबाईलच्या बाजारात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.