पावसाळा आला म्हटलं की घरात पहिला कार्यक्रम सुरु होतो तो म्हणजे छत्री शोधण्याचा….पुर्वीच्या काळी लोक साधी काळी छत्री वापरायचे, पण सध्या छत्र्याही मॉडर्न झाल्या आहेत. वेगवेगळ्या सुंदर डिझाईन असलेल्या छत्र्यांना बाजारात चांगली मागणी असते. पण मग याच छत्रीवर जर तुम्ही स्वत: रंग दिलेत, किंवा काही लिहिलंत तर कसलं भारी वाटेल. नेमका हाच अनुभव मुक्ताक्षरे कॅलिग्राफी स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना आला.

नुकतंच मुक्ताक्षरे कॅलिग्राफी स्कूल ऑफ आर्टने केळवा येथे अम्ब्रेला वर्कशॉपचं आयोजन केलं होतं. या वर्कशॉपचा मुख्य हेतू होता विद्यार्थ्यांना अम्ब्रेला कॅलिग्राफी शिकवणे. स्कूलचे आजी माजी असे एकूण ४५ विद्यार्थी या वर्कशॉपमध्ये सहभागी झाले होते. एरव्ही कागदावर उधळण्यात येणारे ते रंग आणि ते वळणदार अक्षर जेव्हा छत्रीवर कोरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली तेव्हा त्यांचाही उत्साह प्रचंड वाढला होता.

मुक्ताक्षरे कॅलिग्राफी स्कूल ऑफ आर्टचे प्रमुख जय सावंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अम्ब्रेला वर्कशॉपचे धडे दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनीही दिलखुलासपणे छत्र्यांना निसर्गाची साथ देत रंग उधळले. सुरुवातीला आम्हाला जमेल की नाही अशी भीती वाटत होती. कारण कागदावर काम करणं सोपं असतं, पण छत्रीवर एकदा चूक झाली तर पुन्हा कसं करायचं असा प्रश्न पडत होता. पण जेव्हा करायला घेतलं तेव्हा हे इतकं सुंदर होईल याची आम्हालाही कल्पना नव्हती असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे यावेळी काही विद्यार्थ्यांनी कॅलिग्राफीचा वापर रांगोळीत कसा केला जाऊ शकतो याचा डेमो दाखवला.

कॅलिग्राफी स्कूल ऑफ आर्टने यानंतरही पुन्हा एकदा हे वर्कशॉप घेण्याचं ठरवलं आहे. लवकरच मुंबईत किंवा मुंबईबाहेर वर्कशॉप घेतलं जाणार असल्याची माहिती जय सावंत यांनी दिली आहे.