मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांची होणारी धावपळ थांबवण्याच्या हेतूने महापालिकेने एक मोबाइल अ‍ॅप आणले आहे.  Air-Venti असे या अ‍ॅपचे नाव असून याद्वारे कोणत्या रुग्णालयात आयसीयू खाटा व व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत याची माहिती मिळेल. गुगल-प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप विनामूल्य उपलब्ध झालं आहे.

बुधवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘एअर व्हेंटी’ या अ‍ॅपबाबत माहिती दिली. मुंबईतील सर्व रुग्णालयांची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. पालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या डॅशबोर्डसोबत हे अ‍ॅप संलग्न असणार आहे. नागरिकांना कुठेही धावपळ न करता रुग्णालयातील खाटांची सद्यस्थिती कळणार असून त्यांचा बराच वेळ यामुळे वाचणार आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना मोबाइलवरून एका क्लिकवर कुठल्याही रुग्णालयात किती अतिदक्षता विभागातील खाटा व व्हेंटीलेटर खाटा कार्यान्वित आहे हे समजावे या हेतूने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून मुंबईकरांना एक चांगली सुविधा मिळणार असून करोनाच्या सद्यस्थितीत हे अ‍ॅप मुंबईरकरांना उपयुक्त ठरेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. तसेच, नागरिकांनी गुगल-प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.