गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना उकाड्याने हैराण केले होतं. पण मागील दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी मुंबईचे किमान तापमान २०.४ अंशावर येऊन ठेपले तर शनिवारी २१.६ अंशाची नोंद झाली होती. किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना थंडीची हुडहुडी भरणार आहे.

उत्तरेत अजून थंडीची चाहूल लागलेली नाही. उत्तरेतून थंड वारे येऊ लागले की, मग तापमानात घट दिसेल. सध्या मुंबईचे किमान तापमान नोव्हेंबरच्या सरासरी किमान तापमानाएवढेच आहे. कमाल तापमानही सरासरीच्या आसपास आहे.

राज्याचा विचार करता अनेक ठिकाणचे किमान तापमान अद्याप म्हणावे तसे खाली उतरले नाही. मात्र तरीही राज्यात ठिकठिकाणी हवामान काहीसे थंड आहे. रात्री गारवा आणि दुपारी कडक ऊन अशा काहीशा दुहेरी वातावरणाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. महिन्याभरापासून मुंबईकरांना ऊन आणि उकाड्याने हैराण केले होते. मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर पोहचले होते. तब्बल तीन एक वेळा ३७ अंश तापमान नोंदविण्यात आले होते. कमाल तापमानात काही अंशी चढ उतार नोंदविण्यात येत होते. मात्र ऊन आणि उकाडा काही कमी होत नव्हता.