आभास निर्माण करणारे रसायन असलेली अळिंबी म्हणजे मशरूम हे तीव्र प्रकारच्या नैराश्यावर उपयोगी असल्याचे दिसून आले आहे. केवळ बारा लोकांवर उपचार करून हा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे, तरीही नैराश्याच्या रुग्णांसाठी ही आशादायी बाब मानली जात आहे. सिलोसायबिन असे या रसायनाचे नाव असून त्यामुळे मेंदूतील सेरोटोनिन संग्राहक उत्तेजित होतात परिणामी व्यक्ती एकदम आनंदी मूडमध्ये राहते. या औषधामुळे या रुग्णांमध्ये फार वेगळे परिणाम दिसून आले असून किमान आठ जणांमध्ये नैराश्याचा मागमूसही उरला नाही, असा दावा करण्यात आला आहे.
लॅन्सेट सायकिअ‍ॅट्री या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले असून बऱ्या झालेल्या आठ रुग्णांपैकी किमान पाच रुग्ण तीन महिने नैराश्यापासून दूर आहेत. तज्ज्ञांनी सावधपणे या संशोधनाचे स्वागत केले असून या मशरूम्सचा उपयोग गुणकारी असला, तरी तो अजून पूर्ण सिद्ध झाला नसल्याचे म्हटले आहे. आणखी मोठय़ा प्रमाणावर या मशरूममधील रसायनाच्या चाचण्या घेण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यात चाचणीच्या सुरुवातीला किमान नऊ रुग्णांना तीव्र स्वरूपाचे व जुनाट नैराश्य होते व तीन जणांना मध्यम स्वरूपाचे नैराश्य होते. एक रुग्ण तर तीस वर्षै नैराश्याने पछाडलेला होता. त्या सर्वानी आधी नैराश्यावर वेगळ्या पद्धतींनी उपचार करून घेतले होते, पण त्यात यश आले नव्हते.
इम्पिरियल कॉलेज लंडन या संस्थेत या रुग्णांना मशरूममधील सिलोसायबिन हे रसायन देण्यात आले. अनेक मशरूममध्ये असेल एवढे रसायन त्यांना दिले जात होते, त्यानंतर त्यांच्यावर त्याचा परिणाम सुरुवातीला सहा तास टिकला, नंतर त्यांना अभिजात संगीत ऐकवण्यात आले व मानसिक आधारही देण्यात आला. डॉ. रॉबिन कारहार्ट हॅरिस यांनी सांगितले, की सिलोसायबिनचा परिणाम चांगला आहे व त्यामुळे मनाला शांततेचा अनुभव येतो व चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. सध्या नैराश्यावर ज्या उपचारपद्धती आहेत, त्यापेक्षा सर्वात चांगला परिणाम या मशरूममधील रसायनाने दिसून आला आहे, त्याच्या अधिक चाचण्या घेण्याची गरज आहे. प्रा. डेव्हिड नट यांनी असा दावा केला, की माणूस एकाच निराशाजनक विचारात अडकून पडला तर तो आत्मटीका करू लागतो व नकारात्मक बनतो, पण या औषधाने मनाला वंगणासारखा फायदा होतो व तो नैराश्यातून मुक्त होतो. सिलोसायबिन हे जे रसायन या मशरूममध्ये आहे ते मेंदूतील सेरोटोनिनशी संबंधित संग्राहकाला उद्दीपित करते.
ज्या लोकांमध्ये सेरोटोनिनचे कार्य व्यवस्थित चालते त्यांना सतत उत्साही वाटत असते हे याआधी सिद्ध झालेले आहे. यात रुग्णांची माहिती तीन महिन्यांतीलच आहे, त्यामुळे आणखी प्रयोग करण्याची गरज आहे, असे डॉ. कारहार्ट हॅरिस यांनी सांगितले. यातील प्रा. नट यांना सरकारने औषध सल्लागारपदावरून फटकळपणामुळे काढले होते, पण त्यांच्या मते लालफितीच्या कारभारामुळे ३० पौंडाचे औषध लोकांना १५०० पौंडांना घ्यावे लागते व कुणा शहाण्या माणसाला हा वेडेपणा आहे हे पटेल.