News Flash

शांत झोप हवी असेल तर ‘हे’ करा

झोपेच्या विविध समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींना कालांतराने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार जडण्याची शक्यता जास्त असते. मात्र त्यावर वेळीच उपचार व्हायला हवा.

शांत झोप हवी असेल तर ‘हे’ करा
प्रातिनिधिक छायाचित्र

झोप ही आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. व्यक्तीनुसार हे प्रमाण बदलत असले तरीही सामान्यपणे ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. लहान बाळांना झोपविण्यासाठी आपल्याकडे अंगाई गीत म्हटले जाते. मोठ्या माणसांनादेखील झोपण्यापूर्वी संगीत ऐकण्याचा हा उपाय लागू होतो का? तर झोप या विषयावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले आहे. या संशोधनानुसार झोपण्यापूर्वी संगीत ऐकले, तर सर्वच वोगटातील लोकांना चांगली व शांत झोप मिळू शकते.

बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यात आहाराबरोबरच झोपेच्या वेळा, अपुरी झोप यांसारख्या समस्यांचाही समावेश होतो. झोपेच्या विविध समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींना कालांतराने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार जडण्याची शक्यता जास्त असते. सुदैवाने चांगल्या झोपेसाठी इतर उपचारांवरोबरच संगीत उपचार पध्दतीलाही शास्त्रीय आधार मिळालेला आहे. या पध्दतीने झोपेच्या समस्यांवर मात करता येते, हे सिध्द झाले आहे. सध्या याबाबत मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरु असून काही संगीतकार तंत्रज्ञांच्या सहाय्याने चांगली, स्वस्थ झोप मिळण्यासाठी विशेष संगीत, गाणी निर्माण करीत आहेत. मार्कोनी युनियन यांनी असेच एक ‘वेटलेस’ हे गाणे ‘ब्रिटिश अकॅडमी ऑफ साऊंड थेरपी’ यांच्याबरोबर निर्माण केले. हे गाणे ऐकल्याने सर्वात जास्त आराम मिळतो, हे झोप विषयातील तज्ज्ञांनी मान्य केले आहे. स्लीप@10, गोदरेज इंटिरिओ या उपक्रमामध्येही याबाबतचा अभ्यास केला गेला आहे.

शांत झोपेसाठी संगीत कशी मदत करते?

संगीतामुळे आपल्या शरीरात काही निश्चित स्वरुपाचे बदल होतात. त्यांच्यामुळे आपण निवांतपणा अनुभवतो व शांत झोपू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक अवस्थेवर संगीत परिणाम करते. त्याची परिणती म्हणजे आपला रक्तदाब, हृदयाचे ठोके यांची गती कमी होऊ लागते. चांगली झोप न लागण्यास हेच तणाव कारणीभूत असतात. संगीतामुळे ‘एन्डोजेनस ओपिऑईडस’ व ‘ऑक्सीटोसिन’ यांसारखे हार्मोन्स निर्माण होऊन आपल्या मनावरील ताण व वेदना कमी होतात.

नेमके कोणत्या प्रकारचे संगीत ऐकावे?

मिनिटाला साठ ठोके या गतीने चालणारे कोणतेही संगीत झोप येण्यास उपयुक्त असते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. माणसाच्या भावना चाळवणारे, जास्त गतीचे किंवा इलेक्ट्रिक गिटार, ड्रम्स अशी मोठ्या आवाजाची वाद्ये असणारे संगीत झोपण्यापूर्वी टाळावे. शास्त्रीय आणि हळूवार गतीचे जॅझ संगीत ऐकल्यास जास्त चांगले. यामध्येही सागराच्या लाटा व पाऊस यांचा आवाज ऐकवणारे संगीत, तणाव व काळजी घालवणारा आवाज ज्यामध्ये आहे अशी ऑडिओ पुस्तके, ध्यान-धारणा करताना ऐकायचे संगीत, ओम स्मरण यांचा समावेश केल्यास ते जास्त फायदेशीर ठरते.

हे आहेत पर्याय 

सध्या ‘स्लीपरेडिओ डॉट कॉम’, ‘अॅम्बियन्टस्लीपिंगपिल डॉट कॉम’, ‘दिगस्टर डॉट एफएम स्लॅश स्लीप’ तसेच ‘स्पॉटीफाय डॉट कॉम’ या वेबसाईटस असे हलके संगीत ऐकता येते. अनेक वयस्कर व्यक्तींनाही झोप न येण्याचा त्रास असतो अशांना या संगीताने झोप येण्यास मदत होते. ‘डाऊनलोड’ करून अथवा थेट वेबसाईटवरून हे संगीत ऐकता येते. त्यामुळे झोपेची औषधे घेण्यापेक्षा शांत संगीत ऐकणे हा पर्याय केव्हाही चांगला ठरू शकतो. हा केवळ कमी खर्चाचा उपाय नाही, तर कोणतेही ‘साईड इफेक्ट’ नसलेला उपचार आहे. म्हणून, मोबाइलमध्ये आपली ‘स्लीप-प्लेलिस्ट’ बनवा आणि मस्त गुडूप झोपून जा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 12:22 pm

Web Title: music is good therapy for sound sleep
Next Stories
1 ५ हजार ९९९ रुपयांत ‘अनब्रेकेबल स्मार्टफोन’ भारतात लॉन्च
2 Google I/O 2018: भटकंती सोप्पी होणार… गुगल मॅप्सवर हे पाच भन्नाट फिचर्स येणार!
3 माशांचे तेल संधिवाताविरुद्ध उपयुक्त
Just Now!
X