अनेक रोग आणि जिवाणू संसर्गाचे माफक दरात आणि आणखी कमी वेळात निदान करू शकेल, अशा नॅनो तंत्र आधारित संप्रेरक चाचणीचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

ही चाचणी इंग्लंडमधील क्वीन्स विद्यापीठातील (बेलफास्ट) शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. मानव, प्राणी आणि अन्नपदार्थामध्ये ‘प्रोटिआस’ हा रोगांचे लक्षण दाखवणारा संप्रेरक निदर्शक (एन्झाईम मार्कर) आढळतो. त्याचे अस्तित्व दाखवून देणारी ही चाचणी आहे.

प्रोटिआस हा सूक्ष्म जीवांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक प्रकारचे रोग निर्माण होण्यासही तो कारणीभूत ठरतो. ‘नॅनो रिसर्च’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात ही माहिती दिली आहे. जंतूसंसर्ग झालेल्या जखमांमध्ये आणि मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे विकार जडलेल्या रुग्णांच्या लघवीमध्ये प्रोटिआसचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढलेले असते. प्रोटिआसचे प्रमाण शोधण्यासाठी सध्या केल्या जाणाऱ्या चाचण्या अत्यंत महागडय़ा, अधिक वेळ घेणाऱ्या आहेत.

त्या काही वेळा यशस्वीही ठरत नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांनी आता ‘नॅनोसेन्सर’ विकसित केल्यामुळे दूध आणि मूत्रामधील प्रोटिआसचे अस्तित्व तुलनेत कमी वेळात आणि कमी खर्चात शोधणे शक्य झाले आहे.

याबाबत क्वीन्स विद्यापीठाचे क्लाईर मॅकव्हे यांनी सांगितले की, ही नवी चाचणी केवळ स्वस्तात होते असे नाही, तर ती कुठेही करता येते. त्यासाठी प्रयोगशाळेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ही एक मोठी क्रांतीच आहे. त्यामुळे रोगांचे निदानही वेगाने करता येणार आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. या चाचणीत सोन्याच्या नॅनो कणांपासून तयार केलेला संवेदक (सेन्सर) वापरला जातो. डोळ्यांनी दिसणाऱ्या रंगबदलाच्या प्रक्रियेतून तो प्रोटिआसचे अस्तित्व दाखवतो.