बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतं वजन ही प्रत्येकाची समस्या झाली आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्याचा अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. अनेक वेळा डाएट करुनही वाढलेल्या वजनाला आळा बसत नाही. अशा वेळी आहारामध्ये वजन कमी करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. या पदार्थांच्या सेवनामुळे वारंवार लागणाऱ्या भुकेला आळा बसतो.परिणामी वजन लवकर वाढत नाही. असेच काही पदार्थ रुपम सिन्हा यांनी सांगितले आहे.

१. लाल मिरची –
रोजच्या जेवणाला झणझणीतपणा येण्यासाठी अनेक वेळा गृहिणी भाजी, आमटीमध्ये लाल मिरची किंवा लाल तिखटाचा वापर करतात. मात्र जेवणाची रंगत वाढविणारा लाल मिरची वजन कमी करण्यासाठीदेखील तितकीच उपयोगी आहे. लाल मिरचीमध्ये कॅप्सॅकीन संयुग असतात. कॅप्सॅकीनमुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढविण्यास मदत होते. परिणामी वाढत्या वजनाला आळा बसतो.

२. लसूण –
एखाद्या पदार्थाला खमंग फोडणी द्यायची असेल लसूण हा गरजेचाच आहे. मात्र लसणाचा उपयोग केवळ जेवणासाठीच होत नसून आजारपणातही होतो. अनेक वेळा आजारपणामध्ये लसणाचा वापर औषध म्हणून केला जातो. त्याप्रमाणेच वजन कमी करण्यासाठीदेखील लसणाचा उपयोग होतो. जेवणामध्ये लसणाचा समावेश असेल तर जेवताना पोट भरलंय हे भावना मस्तिष्कापर्यंत पोहोचवण्याचं काम लसूण करतो. त्यामुळे पोट भरल्यानंतर आपण आपोआप जेवायचं थांबवतो. त्यामुळे आहारात लसणाचा समावेश करायला हवा.त्यासोबतच रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून लसूण मदत करतो. तर हृदयाचे आरोग्यही नीट राहते.

३. लाल आणि हिरवी मिरची –
मसाल्याच्या पदार्थांमधील महत्वाचा घटक म्हणजे मिरची. लाल मिरचीप्रमाणेच सुकी लाल मिरची किंवा हिरवी मिरची यांचाही तितकाच शरीराला फायदा होतो. मिरचीमध्ये व्हिटामिन ए, सी सोबतच बीटा कॅरोटीन असतं. त्यामुळे योग्य प्रमाणात मिरचीचं सेवण केलं तर पचनक्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात राहते.

४. दालचिनी –
भूक नियंत्रणात ठेवण्याचं महत्वाचं काम दालचिनी करत असते. दालचिनीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यासोबतच दालचिनीच्या सेवनामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढविण्यास मदत होते. दालचिनीमुळे धमन्यांचं कार्यही सुधारते आणि शरीरातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणली जाते.

५. कोकम (आमसुल) –
आंबट, चटपटीत अशी चव असणाऱ्या कोकमाचे अनेक फायदे आहेत. भूक नियंत्रणात आणण्यासाठी कोकमचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे जेवणाच्या पूर्वी रोज एक कोकम खावं.