08 March 2021

News Flash

Navratri 2017 : नवरात्रीचे उपवास करताय? हे लक्षात ठेवा

उत्सव आरोग्यदायी व्हावा यासाठी खास टिप्स

उपवासाला खाण्यात येणारे पदार्थ

नवरात्रीत एक व्रत म्हणून भारतभर भक्तिभावाने उपवास केला जातो. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा सर्व स्तरात हे उपवास केले जातात. देवीच्या या उपवासाने आध्यात्मिक पुण्य मिळत असेलही, शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरणसुद्धा होत असेल, कदाचित मनाला एकप्रकारची स्थिरता व शांतीसुद्धा मिळत असेल; पण शरीराला कष्ट देऊन हे उपवास केले जात असल्याने अशक्तपणा येणे, चक्कर येणे, गरगरणे, तोंडाला कोरड पडणे, पोटात दुखणे अशा आरोग्य धोक्यात येण्याच्या घटनाही पाहायला मिळतात. तेव्हा नवरात्रीचे उपवास करत असलेल्यांनी खालील गोष्टी लक्षात घेतल्यास उपवास करुनही त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच उपयोग होईल.

१. उपवासासाठी दिवसभर अजिबात काही खायचे नाही, किंवा उपासाचे पदार्थ रोज फक्त एकदाच खायचे, असे न करता दिवसातून ५-६ वेळा हे उपवासाचे पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात खावेत.

२. जर निर्जळी उपवास करत असाल तर पाणी, लिंबू सरबत, शहाळे, ग्रीन टी, ताक हे तासातासाला पेलाभर घेत राहावे. उपवासात दिवसातून २ लिटर द्रव पदार्थ घेतल्यास गरगरणे, चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे असे त्रास होत नाहीत.

३. उपवासात तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेल्या गोष्टी खाव्यात. म्हणजे बटाट्याचे चिप्स किंवा साबुदाणा वडा खाण्याऐवजी उकडलेल्या बटाट्याचा कीस, उकडलेले रताळे खावे.

४. साबुदाणा खिचडीत भरपूर तेल किंवा तुप असते. त्याऐवजी साबुदाणा, बटाटा आणि उपवासाच्या भाज्या (सिमला मिरची, पालक, कोबी, घोसाळी) एकत्रित बनवून खाव्यात.

५. राजगिरा हा उपवासाला चालणारा एक उत्तम पदार्थ आहे. त्यात चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. त्याची दुधामध्ये खीर किंवा लापशी बनवून खावी, ताकद मिळते.

Navratri Recipes : उपवासाचा पायनॅपल राइस

६. शिंगाड्याचे पीठ उपवासाला चालते. त्यात ७५ टक्के पिष्टमय पदार्थ आणि २० टक्के प्रथिने असतात. तेलाने माखलेल्या पुऱ्या खाण्याऐवजी या पिठाच्या पोळ्या बनवून खाल्ल्यास आरोग्याला त्या उत्तम असतात.

७. भगर ही नवरात्रीच्या आहारातली महत्वाची गोष्ट. भाताप्रमाणे ती बनवून खाता येते, तिची खीरसुद्धा करून खावी. हवे असल्यास आवडीच्या भाजीसमवेत खायला हरकत नसते.

८. काहींना गोड खाण्याची चटक असते. त्यांनी जिभेला थोडा आवर घालून खजूर, सफरचंद, केळी यांसारखी फळे, भगर, राजगिरा, साबुदाणा यांच्या खिरी खाव्यात.

९. दुपारच्या वेळी खावेसे वाटले तर मनुका, खजूर, अक्रोड, बदाम खावे. अशावेळेस जाहिराती करून प्रसिद्ध केलेला मेवा खाण्यापेक्षा हे उत्तम असते.

नवरात्रीची नऊ वाहनं : ‘सिंहवाहन’

१०. खाण्यामध्ये पदार्थांना गोड चव यावी याकरिता साखर वापरण्याऐवजी गूळ किंवा मध वापरावा. केळी, घोसाळी, साबुदाणा, रताळे, राजगिरा यांचे विविध पदार्थ करून खावेत. यांच्या पाककृती सर्वत्र उपलब्ध असतात.

११. नवरात्रीचे उपवास म्हणजे वजन कमी करायची उत्तम संधी असते. त्यामुळे भूक लागल्यावर काकडी, फळांचे तुकडे, सलाड खाण्यावर भर ठेवावा.

-डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 3:24 pm

Web Title: navratri foods items to eat during fasting in navratri festival 2017
Next Stories
1 jiofi जिओफाय मिळणार केवळ ९** रुपयांत
2 Navratri Recipes : उपवासाचा पायनॅपल राइस
3 सर्व लशी एकाच टोचणीत देण्याचे तंत्रज्ञान विकसित
Just Now!
X