केसांपासून पायाच्या बोटांपर्यंत अनेक प्रकारचे दागिने घातले जात असले तरी गळ्यात घातल्या जाणाऱ्या दागिन्याने त्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे.

दागदागिन्यांची आवड तर सर्वच महिलांना असते, परंतु दागिन्यांमधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे गळ्यातील आभूषणे. दागिन्यांची खरेदी करताना आपण आधी नेकलेस घेतो. मग त्यावर साजेसे कानातले, बांगडय़ा, अंगठी अशा इतर गोष्टी. शिवाय प्रत्येक नेकलेसची एक वेगळीच शोभा असते. घालणाऱ्याच्या गळ्यावर, त्याच्या रंगावर, त्याने घातलेल्या पेहरावावर शोभून दिसेल अशाच नेकलेसची निवड करावी. बसकी मान असलेल्या लोकांनी गळ्याला घट्ट बसतील असे दागिने घालू नयेत. तर काळपट रंग असलेल्या लोकांनी खडय़ाच्या दागिन्यांचा जास्त वापर करू नये, त्यापेक्षा सोनं किंवा मोत्यांचे दागिने त्यांच्यावर गोरा वर्ण असणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त खुलून दिसतात. अशाच प्रकारे आडवा बांधा असलेल्यांनी भरगच्च दागिने घालावेत तर छोटा बांधा असलेल्यांनी नाजूक दागिने घालावेत. एकच हार पण प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे त्यात होणारा बदल नेकलेसमध्ये लगेच जाणवून येतो. तरी काही पारंपरिक नेकलेस असे असतात जे सगळ्यांवर शोभून दिसतात व त्यांची घडणावळच एवढी सुरेख असते की त्यांना घालण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. असेच काही पारंपरिक गळ्यातील आभूषणांचे प्रकार आपण पाहू-

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

मंगळसूत्र –

मंगळसूत्र हा विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दागिना. सौभाग्यवतीला प्राणापेक्षा मोलाचं असणाऱ्या मंगळसूत्राची शान त्याच्या काळ्या मण्यांमध्ये असते. बाकीचे दागिने सोन्या-चांदीच्या धातूंना आकार देऊन बनवण्यात येतात. परंतु मंगळसूत्रात काळ्या मण्यांचं विशेष महत्त्व असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी देखील स्त्रिया वडाची पूजा करून झाल्यावर काळे मणी मंगळसूत्रात ओवतात व त्या काळ्या मण्यांना आपल्या सौभाग्याचं लेणं मानतात. नवीन लग्न झालेल्या वधूने मंगळसूत्राच्या वाटय़ा उलटय़ा बाजूने दिसतील अशी घालण्याची प्रथा आहे व एका वाटीत हळद तर दुसऱ्या वाटीत कुंकू असतं. मंगळसूत्र हे सातवाहन काळापासून चालत आलं आहे. या काळात याला कनकसर किंवा कनकदोर म्हणजेच सोन्याची सर किंवा सोन्याचा दोर असे म्हणत. पुढे यादवकाळात ते कनकसूत्र व हेमसूत्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं तर नंतर त्यास साज असं नाव पडलं. गावाकडे अजूनही मंगळसूत्राला डोरलं म्हणतात तर शहराकडे आता त्याला मंगळसूत्र असं नाव आहे. काळे मणी आणि सोन्याच्या दोन वाटय़ा अशी जरी मंगळसूत्राची रचना असली तरी आता काळ्या मण्यांसोबत वेगवेगळ्या आकाराचं, खडय़ांचं पेंडंट घालून मंगळसूत्राचं वेगळं रूप पाहायला मिळतंय. मंगळसूत्रामध्ये खूप व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आलीय. त्यात जान्हवीचं तीन पदरी मंगळसूत्र मध्यंतरी खूप गाजत होतं. त्या मंगळसूत्राला तीन पदरी मंगळसूत्र म्हणण्यापेक्षा जान्हवीचं मंगळसूत्र म्हणून लोकांना जास्त माहीत होतं. अशाच मालिका, चित्रपटांमधून नायिकेच्या मंगळसूत्राची फॅशन रुजू होतेय.

कोल्हापुरी साज –

साज म्हणजे पारंपरिक पद्धतीचं मंगळसूत्र होय. कोल्हापूरच्या स्थानिक लोकांनी साज हा दागिना मोठय़ा प्रमाणात घातल्याने त्याला कोल्हापुरी साज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या साजात चंद्र, शंख, नाग, कमळ, कासव अशी पदकं समोरासमोर तारेने जोडलेली असतात. मध्यभागी असणाऱ्या लोलकला म्हणजेच पेंडंटला पानडी असंही म्हणतात. पूर्वी साज हा संपूर्ण सोन्याचा अलंकार होता, परंतु काळानुरूप सोन्याच्या वाढत्या भावामुळे साजेमध्ये काळे मणी घातले जाऊ लागले. नजर लागू नये म्हणून हे वापरण्याची प्रथा आहे. त्यानंतर या साजाचा फक्त पेंडंटचा भाग शिल्लक राहिला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं रूपांतर मंगळसूत्रात झालं. काळ्या मण्यांच्या पाच-सहा सरी आणि मध्ये सोन्याचं पेंडंट असलं की त्याला डोरलं म्हणून संबोधू जाऊ लागलं. त्याच प्रकारे कंठा, कारलं, अंबरसा, आयवोळी, पेंडे, गोफ बिरडं, पोत, गुंठण,पोवतं असे अनेक प्रकार मंगळसूत्रात निघाले, परंतु भरभक्कम असा कोल्हापुरी ढाच्यातला संपूर्ण सोन्याचा असलेला कोल्हापुरी साज अजूनही मोठय़ा प्रमाणात वापरला जातो.

पुतळी –

पुतळी हार हा आभूषणाचा प्रकार सतराव्या शतकापासून प्रचलित आहे, परंतु अजूनही तो ग्राहकांच्या मनाला तितकाच भिडतोय. गोल चपटय़ा नाण्यांप्रमाणे असणाऱ्या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनवली जाते त्यास पुतळी माळ असे म्हणतात. या गोलाकार नाण्यांच्या आकाराच्या चकत्यांवर पुरातन काळातील अश्मयुगीन चित्रे किंवा देवी-देवतांची मूíतचित्रे, भित्तिचित्रे, भाला, त्रिशूळ अशी चित्रे काढलेली असतात. पूर्वीच्या काळी सोन्याच्या, चांदीच्या, पितळेच्या पुतळ्या असत. आता फॅशन म्हणून अशा पुतळ्या अँटिक सिल्व्हर, ऑक्सिडाइझमध्ये दिसू लागल्या आहेत. पूर्वी मंगळसूत्रातदेखील सवतीची पुतळी हा प्रकार होता. विवाहित स्त्री स्वर्गवासी झाल्यावर जर तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि पहिल्या पत्नीच्या स्मरणार्थ दुसऱ्या पत्नीला तिची पुतळी द्यावी लागे त्या पुतळीला सवतीची पुतळी म्हणत.

चिंचपेटी –

चिंचपेटी हा आभूषणाचा प्रकार गळ्याला घट्ट भिडून बसणाऱ्या दागिन्यांमध्ये मोडतो. पोकळ सोन्याच्या आयताकार पटीने बनवण्यात येणारा चिंचपेटी हा दागिना आहे. आयताकार दिसणाऱ्या चपटय़ा पेटय़ांवर कोरीव नक्षी कोरून सरीप्रमाणे एकापुढे एक अशी रचना करून चिंचपेटी हा दागिना बनवतात. या भरगच्च सोन्याच्या चिंचपेटीप्रमाणेच नाजूक चिंचपेटीदेखील असते, ती मोत्यापासून बनवली जाते. मोत्यांच्या नाजूक सरींना यष्टीलता किंवा यष्टीका म्हणतात. लांबट टपोरे आकाराचे सोन्याचे मणी तारेत गुंफून जी एकसरीची माळ बनवतात त्याला एकलट किंवा एकदानी म्हणतात, तर बोरमाळेत बोराएवढे सोन्याचे मणी सोन्याच्या नाजूक तारेत गुंफून असतात. मोत्याच्या सरीच्या चिंचपेटीला खाली लटकन म्हणून आणखी मोती जोडले जातात व ते गळ्याभोवती लोंबतात, म्हणून अशा मोत्याच्या चिंचपेटीला लटकन असेही म्हणतात. नाजूक शरीरयष्टीच्या स्त्रियांना मोत्याची लटकन चिंचपेटी शोभून दिसते तर आडवा बांधा असणाऱ्यांना सोन्याची चिंचपेटी.

ठुशी –

श्रीमंत दागिना म्हणून ठुशीचा उल्लेख केला जातो. राजघराण्यातील स्त्रियांच्या अंगावर दिसणारा हा दागिना फार पूर्वीपासून प्रचलित आहे. ठुशी या नावातच त्याचा अर्थ दडला आहे. ठुशी म्हणजे ठासून भरलेला गोल मणी. हा दागिनादेखील गळ्याला भिडून बसणाऱ्या दागिन्यांपकीच एक आहे. गोलाकार वाकलेल्या तारेत सोन्याचे भरीव मणी गुंफून ठुशी दागिना तयार केला जातो. याला व्हरायटी म्हणून एकावर एक असे भरीव चार-पाच सरी तर असतातच, परंतु म्हणून पेंडन्ट म्हणून साडीला मॅचिंग होईल असा एखादा मणी लटकत ठेवला असता त्यात वेगळेपणा येतो. मणी न घालतादेखील खूप सुंदर दिसतो. नऊवारी साडीवर या दागिन्यांची शान काही औरच आहे. त्यावर साजेशी कुडी घातली की झाला एकदम पारंपरिक पोशाख. ठुशीप्रमाणेच चितांग, वजरटीका हे दागिनेदेखील गळ्याला भिडून असणाऱ्यांमधले आहेत.

लफ्फा –

लफ्फा हा दागिना मुसलमानी कलेचा प्रभाव असणारा प्रकार आहे. या दागिन्याला बघूनच त्याची चमक आणि शाहीपणा जाणवतो. मुसलमानी राजघराण्यातील स्त्रिया हा दागिना वापरत. त्यांना हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून रेशमी गादी मागच्या बाजूस लावण्यात येई, याशिवाय हाराला पाठीमागे अडकवण्यासाठी कडय़ा किंवा दोरे असत. अगदी राणीहारासारखा दिसणारा हा लफ्फा कुशलतेने बनवण्यात येई. रंगीबेरंगी आकर्षक खडय़ापासून, सोन्यापासून याची कोरीव घडणावळ केली जाई. यामध्ये बेलपान लफ्फा, गादी लफ्फा असे अनेक प्रकार आहेत. अजूनही मुस्लीम घराण्यात खानदानी दागिना म्हणून लफ्फा ओळखला जातो व त्या स्त्रिया अजूनही लग्नकार्यात त्याचा वापर करतात. आता बाजारात अनारकली ड्रेसवर वगरे घालायला साध्या धातूपासून, खडय़ांपासून लफ्फा तयार केला जातो व कमी भावात विकला जातो.

मोहनमाळ –

बोरमाळेसारखा दिसणारा मोहनमाळ हा प्रकार सध्या स्त्रियांच्या अंगावर जास्त दिसण्यात येतोय. फक्त बोरमाळेत बोराएवढे मणी असतात, तर मोहनमाळेत मिरीएवढे मणी असतात. एकपदरी, दोनपदरी, तीनपदरी अशा कितीही सरीच्या मोहनमाळा असू शकतात. मोहनमाळेप्रमाणेच गुंजमाल, जांभूळमाळ, जवमाळादेखील असतात. मोहनमाळेत सोन्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.

पोहेहार –

पोहेहार म्हणजे सोन्यापासून घडवलेली पोह्य़ासारखी दिसणारी बारीक नक्षीची माळ. जय मल्हार मालिकेतील म्हाळसाने परिधान केलेल्या पोहेहारामुळे या दागिन्याला पुन्हा मार्केटमध्ये भाव आला आहे. लांबसडक असणारा हा पोहेहार त्याच्यावरच्या पोह्य़ासारख्या बारीक नक्षीमुळे सुरेख दिसतो. सध्या यात व्हरायटी म्हणून पोहेहार कम लक्ष्मीहार हा प्रकार निघाला आहे. पोहेहारात मध्ये मध्ये लक्ष्मीचे चित्र असणारे गोलाकार चपटे नाणे आणि मध्ये मध्ये पोह्य़ाची नक्षी अशा प्रकारे या हाराची रचना असते. सोन्याचा असणारा हा पोहेहार सध्या लोकनृत्यासाठी कलाकार वापरतात, म्हणून तो पत्र्याच्या धातूपासून कमी किमतीतदेखील बनवण्यात येत आहे.

लक्ष्मीहार –

लक्ष्मीहार हा पारंपरिक दागिना महिलांच्या खास पसंतीचा. गोलाकार छोटय़ा चपटय़ा मण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा कोरून व एकावर एक अशी नाण्यांची रचना करून आतल्या बाजूस छोटे किंवा चपटे मणी असतात. हा लक्ष्मीहार काठपदराच्या साडय़ांवर शोभून दिसतो आणि भरगच्च भासतो. पारंपरिक लक्ष्मीहार जरी महिलांना प्रिय असला तरी काळानुरूप त्यात थोडा बदल होऊन त्यात मध्ये पेंडन्ट, कुंदन घातले जाऊ लागले, शिवाय दुपदरी लक्ष्मीहारदेखील महिलांना आवडू लागला. त्यात चेनॉय लक्ष्मीहार हा दागिना म्हणजे मद्रासी डिझाइनचा लक्ष्मीहार आहे. लक्ष्मीहारासोबत हारातल्याच नाण्यांमधली तीन नाणी जोडून त्याचे कानातले तयार करून सेट केला जातो. हे कानातलेदेखील खूप सुंदर दिसतात.

असे गळ्यातील आभूषणांचे प्रकार जेवढे पाहू तेवढे कमीच. पोवळे, खडे, मोती, कुंदन, मीनावर्क केलेल्या दागिन्यांची सध्या चलती आहे, तर सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही लोक पसंती दर्शवतात. सध्या महागाई वाढत जात असल्यामुळे सोन्याची जागा अँटिक गोल्ड, बेन्टेक्सने घेतली, तर चांदीची जागा अँटिक सिल्वर ऑक्सिडाइझने घेतली आहे. सोन्या-चांदीचे दागिने जर रोजच्या वापरात नसतील तर ते काळपट पडण्याची शक्यता असते. ते पुन्हा पॉलिश करून घेण्यापेक्षा हे अँटिक दागिने रोजच्या वापरासाठी उत्तम. याशिवाय सेमी क्रशर स्टोन,ऑनिक्स स्टोन, अमेरिकन डायमंडचे दागिने घातल्यावर रिच लुक येत असल्यामुळे अशा दागिन्यांकडेही लोकांचा कल वाढतो आहे. एकूणच काय तर दागिना कोणताही असो त्याचा आकर्षकपणा, त्यावरील नक्षी, त्याचा रंग पाहून तो घेण्याचा मोह स्त्रियांना आवरत नाही. त्याचा वापर कितपत होईल हे माहीत नसतं, परंतु हा दागिना आपला व्हावा असा वेडा हट्ट प्रत्येक स्त्रीचा असतो.
अमृता अरुण – response.lokprabha@expressindia.com