अमेरिकी ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस Netflix  ने भारतीय ग्राहकांना दणका दिलाय. कंपनीने भारतात दिली जाणारी एक महिन्याची ‘फ्री ट्रायल’ सेवा बंद केली आहे. पण, त्याबदल्यात आता कंपनीने एक नवी योजना आणली आहे.

नेटफ्लिक्सने भारतात दिली जाणारी एक महिन्याची फ्री ट्रायल सेवा बंद केली आहे. पण, आता कंपनीने एक नवी सेवा सुरू केली असून यानुसार ग्राहकांना नेटफ्लिक्सच्या पहिल्या महिन्यासाठी पाच रुपये द्यावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा केवळ नव्या ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल. जुन्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही. जे ग्राहक पहिल्यांदा नेटफ्लिक्सवर लॉगइन करतील त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध असेल. सध्या या सेवेची चाचणी सुरू आहे. त्यामुळे सर्व नव्या ग्राहकांना नव्हे तर निवडक नव्या ग्राहकांनाच या सेवेचा पर्याय दिसेल.

“हे पाऊल नेटफ्लिक्सच्या मार्केटिंगच्या दृष्टीकोनातून उचलण्यात आलंय . सध्या या ऑफरची चाचणी सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही सेवा सर्व नव्या ग्राहकांसाठी उपलब्ध होईल”, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी Gadjet 360 सोबत बोलताना दिली. Netflix एक व्हिडिओ Streaming सर्व्हिस असून याद्वारे अनेक लोकप्रिय टीव्ही शो, सिनेमे आणि वेब सिरिज पाहता येतात.