भारतात स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्सची (Netflix) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. भारतातील व्यवसाय अधिक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून आता कंपनी लवकरच आपले नवीन स्वस्तातील प्लॅन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे प्लॅन तीन महिने, सहा महिने आणि 12 महिन्यांसाठी असणार आहेत. या नव्या प्लॅनची अद्याप टेस्टिंग केली जात आहे.

नेटफ्लिक्सच्या लाँग टर्म प्लॅन्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांचे २० ते ५० टक्क्यांपर्यंत पैसे बचत होऊ शकते. तर, भारतात नेटफ्लिक्सने काही महिन्यापूर्वी Mobile Only प्लॅन लाँच केले आहेत. केवळ मोबाइल प्लॅन्स भारतात १९९ रुपये प्रति महिन्यांपासून सुरू होईल. तर, नेटफ्लिक्सच्या लाँग टर्म प्लॅनची सुरुवात १ हजार ९१९ रुपयांपासून सुरू होऊ शकते. या सर्व प्लॅनची सध्या चाचणी सुरू आहे. तीन महिन्याच्या प्लॅनसाठी १ हजार ९१९ रुपये, ६ महिन्यांच्या प्लानसाठी ३ हजार ३५९ रुपये तर १२ महिन्याच्या प्लानसाठी ४ हजार ७९९ रुपये आहे. या प्लॅन्सची तुलना सध्याच्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनसोबत केल्यास याची किंमत ५० टक्क्यांपर्यंत कमी आहे. दरम्यान, अद्याप कंपनीकडून हे प्लॅन्स अधिकृत करण्यात आलेले नाही.

“नेटफ्लिक्स लाँग टर्म प्लॅन्सवर काम करीत आहे. याची चाचणी केली जात आहे. लोकांच्या प्रतिसादानंतर हे प्लॅन लाँच करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल”, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.