नेटफ्लिक्स आणि चिल हे समीकरण आपल्यासाठी नवीन नाही. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय मनोरंजन सृष्टीला जोडणारा एक दुवा म्हणून नेटफ्लिक्स प्रसिद्ध आहे. नेटफ्लिक्समधे आता नवीन ‘माय लिस्ट’ हे फिचर आले आहे. यामध्ये तुम्ही आवडणाऱ्या किंवा बघायच्या आहेत अशा चित्रपट आणि टीव्ही मालिकेची पर्सनलाईज्ड वॉचलिस्ट तयार करू शकता. यामध्ये स्वतःहून क्रमवारीही तयार होते. ज्यात लेटेस्ट एपिसोड यादीच्या बरोबर वरच्या बाजूला दिसतात. तसेच यामध्ये तुम्हाला आवडू शकतील अशा चित्रपटांची शिफारस देखील केली जाणार आहे.

‘माय लिस्ट’ हे फिचर कसे वापरायचे?

‘माय लिस्ट’ हे फिचर वापरण्यासाठी प्रथम स्मार्टफोन अॅप किंवा वेब ब्राउझर किंवा स्मार्ट टीव्हीचा वापर करुन आपल्या नेटफ्लिक्स खात्यावर लॉग इन करा. त्यानंतर आपल्याकडे असलेल्या डिव्हाइसनुसार खालील सूचनांचे अनुसरण करा.

१. वेब ब्राउझर –

आपल्याला हव्या त्या चित्रपट किंवा टीव्ही मालिकेच्या नावावर कर्सर ठेवा आणि प्लस हे चिन्ह निवडा.

२. मोबाइल अॅप –

Android मोबाईलसाठी आपल्याला हव्या त्या चित्रपट किंवा टीव्ही मालिकेचे नाव निवडा आणि ‘तपशील आणि अधिक’ (‘Details & More’) हा पर्याय निवडा. नंतर ‘प्लस’ चिन्हावर टॅप करा. IOS साठी आपल्याला हव्या त्या चित्रपट किंवा टीव्ही मालिकेचे नाव निवडून ‘प्लस’ चिन्हावर टॅप करा.

३. स्मार्ट टीव्ही –

मोबाईल आणि ब्राउझरप्रमाणेच आपल्या स्मार्ट टीव्हीवर देखील आपल्याल बघायला आवडणाऱ्या चित्रपट किंवा मालिकेच्या नावाची निवड करून त्याला ‘माय लिस्ट’ या फिचरवर क्लिक करत तुम्ही यादीमध्ये जोडू शकता.

‘माय लिस्ट’ होणार आपोआप अपडेट!

जेव्हा तुम्हाला आगामी चित्रपट किंवा मालिका बघायची असते तेव्हा हा ऑप्शन खूप कामी येतो. आपण आगामी चित्रपट किंवा मालिकेसाठी ‘रिमांइड मी’ हा पर्याय निवडला की ते प्रदर्शित झाल्यावर आपोआप ‘माय लिस्ट’ मध्ये अपडेट होतात. तुम्ही तुमच्या होम पेजवर डावीकडे वरच्या बाजूला ‘माय लिस्ट’ हा पर्याय शोधू शकता. खाली स्क्रोल करून संपूर्ण यादी बघू शकता. मोबाईलवर हा पर्याय ‘प्रोफाइल आणि मोर’ मध्ये दिसेल. तर टीव्हीच्या होम पेजवर डाव्या बाजूला ‘मेन्यू’ मध्ये ‘माय लिस्ट’ या पर्याय उपलब्ध असेल.