क्षय रोग विकसित होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच त्याचे निदान करणारी रक्त चाचणी वैज्ञानिकांना आढळून आली आहे. क्षय रुग्णांसोबत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये क्षय रोग विकसित होण्याचा सर्वाधिक धोका असतो. संसर्ग झालेल्या केवळ ५-२० टक्के लोकांमध्येच क्षय रोग विकसित होतो.

हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ अन्ड क्रिटीकल केअर मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्यक्तीमध्ये क्षय रोग विकसित होणार का नाही याचे निदान चार जणुकांच्या संयोजनाच्या मूल्यमापनातून देणारी रक्तचाचणी संशोधकांनी विकसित केली असून त्याला मान्यता दिली आहे.

या रक्तचाचणीमुळे दोन वर्षांपूर्वी क्षय रोग होणार का नाही याची शक्यता रक्तातील चार जणुकांच्या संयोजनातून वर्तविली जाऊ शकते, असे दक्षिण आफ्रिकेतील स्टेलनबॉश विद्यापीठातील गेरहार्ड वाल्झ यांनी सांगितले. ‘आरआयएसके-४’ हे चार जणुकांचे संयोजन प्रक्षोभक प्रतिसादासाठी कारणीभूत असते. या जणुकांचे स्वतंत्र घटक रोगाचे निदान करण्यासाठी पुरेसे नसले तरी या जणुकांच्या संयोजनामुळे रोग होण्याबाबत अधिक अचूक अंदाज वर्तविला जाऊ शकतो, असे वाल्झ यांनी म्हटले.

या अभ्यासाठी क्षय रोगाच्या रुग्णासोबत राहण्याऱ्या व्यक्तींना केंद्रित करण्यात आले होते. यासाठी एचआव्ही नेगेटिव्ह असणाऱ्या ४,४६६ व्यक्तींची रक्तचाचणी करण्यात आली.  सध्या क्षयरोगाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या चाचणीसह ही नवी रक्तचाचणी देखील सामान्य आरोग्य केंद्रांमध्ये देखील उपलब्ध व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, असेही वाल्झ यांनी म्हटले. क्षयरोग हा मायोबॅकटेरियम टयूबरक्लोसिसच्या संसर्गामुळे होतो. जगभरात क्षयरोगाचे एक कोटींहून अधिक प्रकरणांचे निदान करण्यात येते. दरवर्षी दोन कोटी लोकांचा या रोगामुळे मृत्यू होतो.