कर्करोगाविरोधात कोणते औषध जास्त चांगले काम करू शकेल हे दाखवणारे नावीन्यपूर्ण उपकरण विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण मायक्रोफ्लुइडिक सिस्टमवर आधारित असून त्यात विविध कप्पे आहेत. त्यात हायपॉक्सिक पेशींवर औषधांचा परिणाम तपासता येतो. उपचारांना कोणत्या पेशी दाद देत नाहीत हे त्यातून समजते. काच व प्लास्टिकचे हे उपकरण बनवले असून त्यात औषधानंतर पेशीभोवतीची परिस्थिती व त्यांचा परिणाम या उपकरणात वास्तव पातळीवर कळतो, असे ब्रिटनच्या हडर्सफील्ड विद्यापीठाचे रॉजर फिलिप्स यांनी म्हटले आहे. यात स्पेरॉइड पेशी प्रयोगशाळेत वाढवून त्यावर प्रयोग करण्यात आले. त्रिमिती स्वरूपाच्या पेशींमुळे प्रत्यक्ष औषधाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे तपासता येते. औषध पेशीत फिरताना दिसते व हायोक्सिआ तयार होताना दिसतो, असे फिलिप्स यांचे म्हणणे आहे. या उपकरणाचा उपयोग इतर कारणांसाठीही करता येईल. कर्करोग पेशी जीवशास्त्रात बरीच प्रगती झाली असून नवीन औषधांच्या मान्यतेला मात्र तेवढी गती मिळालेली नाही. आता या उपकरणामुळे कर्करोगावर नवी औषधे लवकर येऊ शकतील. मायक्रोफ्लुइडिक उपकरणांमुळे कर्करोगाच्या पेशींचे सदृशीकरण करून प्रयोग करणे शक्य होणार आहे. ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)