कर्करोगावरील नवीन औषध लहान मुलांसाठी प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. बहुतेक कर्करोगविरोधी औषधे ही शरीरातील विशिष्ट अवयवांना लक्ष्य करीत असतात. त्यातील लॅरोट्रेकनिब या औषधाला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली आहे. काही कर्करोगात टीआरके जनुक हा दुसऱ्या जनुकाला चिकटतो त्याला फ्यूजन म्हणजे संमीलन म्हणतात, असे टेक्सास विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्राचे टेड लात्श यांनी सांगितले. टीआरके जनुकाला दुसरे जनुक जोडले जाते तेव्हा ते कार्यान्वित झाल्याने कर्करोग बेसुमार रूप धारण करतो. लॅरोट्रेकनिबया औषधाचे वैशिष्टय़ असे की, ते विशिष्ट अवयवावरच मारा करते. लॅन्सेट ऑन्कॉलॉजी जर्नलमध्ये या संशोधनाची ही माहिती देण्यात आली. लॅरोट्रेकनिब हे औषध टीआरके जनुकाच्या संमीलनास विरोध करते. हे संमीलन अनेक कर्करोगांना कारण ठरते. सामान्यपणे प्रौढांमध्ये ही जनुके एकत्र होण्याचे प्रमाण कमी असते. मुलांमध्ये हा कर्करोग जास्त असतो त्यात फायब्रोसरकोमा, सेल्युलर कॉनजेनिटल मेसोप्लास्टिक नेफ्रोमा व पॅपिलरी थायरॉइड कॅन्सर यांचा समावेश आहे. टीआरके संमीलनाने कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये औषधाचा चांगला परिणाम दिसून आला. प्रौढांमध्ये ७५ टक्के रुग्णात औषधाचा परिणाम झाल्याचा दावा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये करण्यात आला आहे. फुफ्फुस, आतडे, थायरॉइड आणि स्तनाचा कर्करोगही टीआरके संमीलन उत्परिवर्तनामुळे होऊ शकतो. टीआरके हा जनुक थ्रोम्पोमायोसिन रिसेप्टर किनेज नावाने ओळखला जातो, त्यामुळे मेंदू आणि चेतासंस्थेचा विकास होतो. लॅरोट्रेक्टनिब औषधाने यातील दोष दूर केले जातात.