इंधन पिते.पण मन:शांती लाभते

बापू बैलकर

नवीन होंडा सिटी..किंमत थोडी जास्त आहे, इंधनही जरा जास्त पिते.मात्र वाहन चालविताना सुरक्षेसह सहज आणि मन:शांती लाभणारा प्रवास आणि कनेक्टेड कार घेण्याचा विचार करीत असाल तर नवीन होंडा सिटीचा पर्याय योग्य ठरू शकतो.

भारतामधील प्रीमियम कारमधील अग्रेसर निर्माती कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपली नवीन ५ व्या पिढीची होंडा सिटी नुकतीच प्रस्तुत केली आहे. जानेवारी १९९८ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच प्रस्तुत झालेली, होंडा सिटी देशातील यशस्वी मध्यम आकाराची सेडान आहे. कारचे मूळ रूप कायम ठेवत तंत्रस्नेही ग्राहकांच्या अपेक्षांचा विचार करीत अनेक बदल करीत ही कार बाजारात आणली आहे. ती दिसायला आकर्षक, उत्कृष्ट परफॉर्मन्स, प्रशस्त, आरामदायी, सुरक्षित आणि कनेक्टिव्हिटी कार असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

ही कार उत्तम, मध्यम आणि खराब रस्त्यांवर काय अनुभव देते, हे पाहण्यासाठी आंम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, पुणे ते बेगळूर महामार्ग आणि शिरवळ ते भोर या तालुकाअंतर्गत खराब रस्त्यांवर चालवून पाहिली. गाडी चालविताना मन:शांती मिळते. कुठेही खड्डा किंवा गतिरोधकाचा अडथळा आला तर आतील प्रवाशांना जाणीव होत नाही, इंजिनशक्ती जबरदस्त असल्याने गाडी कोणत्याही वेगात कोणत्याही गिअरवर वेग पकडते..अगदी ० ते १०० चा वेग फक्त दहा सेकंदात घेते. १६० पर्यंत वेग वाढवला तरी अगदी सहज चालते. मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांना किंचितसा एक आवाज येतो, मात्र तो मन:शांती बिघडवतो असे नाही.

डिझाइन ठीक आहे

होंडाने गाडीच्या बाहेरील रचनेत काही मोठे बदल केलेले नाहीत. बाहेरून ती पाहताक्षणी डोळ्यात भरेल असे वाटत नाही. मात्र रात्रीच्यावेळी ती आकर्षित करते. एलईडीने गुंडाळलेली वीज व्यवस्था तिचे रूप अधिक मोहक करते. या गाडीत सनरूप असून प्रवासाचा आनंद वाढवते.

इंधन पिते

भव्यता, शक्ती यामुळे गाडी चालविण्याचा अनुभव चांगला असला तरी इंधन कार्यक्षमतेबाबत थोडी कमतरता वाटते. १७.८ ते १८.४ किमी प्रति लिटरची इंधन कार्यक्षमतेची हमी कंपनी देते. मात्र गाडी चालविताना हा अनुभव येत नाही. मुंबईतून एक्सप्रेस वेवर जाईपर्यंत ९ किमी प्रति लिटर तर एक्सप्रेसवेवर अगदी जास्तीत जास्त १४.५ पर्यंत ही क्षमता वाढलेली दिसली. ग्रामीण रस्त्यांवर तर ती ९ च्या खालीच राहिली.

कनेक्टिव्हीटी

ही कार अ‍ॅलेक्सा रीमोट क्षमतेसोबत जोडलेली आहे. अ‍ॅलेक्साला व्हॉइस कमांड देऊन, अमेझॉन वरून क्लाउड-बेस व्हॉइस सव्‍‌र्हिसचा वापर करून  ग्राहक घरूनच १० प्रमुख वैशिष्टय़ांचा वापर करून कार मॉनिटर आणि कंट्रोल करू शकतो. एसी चालू/बंद करणे, दार चालू/बंद करणे, इंधनाची स्थिती तपासणे, कार लोकेट करणे, आणि कार डॅशबोर्ड पासूनची स्थिती तपासणे या सर्व गोष्टी आरामात करू शकतात. मात्र टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी असल्याने आंम्हाला हा अनुभव घेता आला नाही. ३२ विविध प्रकारची कनेक्टिव्हिटी गाडीत दिलेली आहे.

सुरक्षेवर भर

गाडीत सहा एयरबॅग दिल्या आहेत. शिवाय ईबीडी आणि ब्रेक असिस्टसह एबीएस, व्हेइकल स्टॅबिलिटी, हिल स्टार्ट असिस्ट, होंडा लेन वॉच कॅमेरा, मल्टी अँगल रीयर कॅमेरा, इमरजन्सी स्टॉप सिग्नल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आदी सुविधा दिल्या आहेत. ज्या गाडीतील प्रवाशांची सुरक्षा घेतात. इतर सुरक्षा साधने महत्त्वाची आहेतच पण यातील ‘लेन वॉच कॅमेरा’चा चांगला अनुभव आहे. चालकला मार्गिका बदलताना याचा खूप फायदा होता. अपघाताचा धोका जवळपास टळतो. डाव्या बाजूच्या आरशात हा कॅमेरा बसविला असून मार्गिका बदलण्याचा सिग्नल दिल्यानंतर इन्फोरटेन्मेंट सिस्टमवर डाव्या बाजूची सर्व परिस्थिती हा कॅमेरा दाखवतो. मागील गाडी किती दूर व अंतर ठेवून आहे, याची स्पष््ट माहिती मिळत असल्याने चालकाला अगदी सहज मार्गिका बदलणे शक्य होते. फक्त रात्रीच्या वेळी एवढी स्पष्टता जाणवत नाही. मागील वाहनांच्या लाईटचा प्रखर प्रकाश आरशावर पडत असल्याने अंधूक दिसते.

गाडीत चालकासाठी अतिशय महत्त्वाचे  असलेले २०.३ सेमीचे अत्याधुनिक टचस्क्रीन डिस्प्ले ऑडियोने सुसज्ज आहे. जे अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह कनेक्ट होते. ज्यामुळे वाहन चालविताना सामाजिक आणि डिजिटल पद्धतीने जोडले जातो. १७.७ सेमीचे एचडी फूल कलर टीएफटी मीटर आहे.

 पाच रंगात उपलब्ध

नवीन सिटी पाच रंगांत उपलब्ध आहे.  रेडिएंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, मॉडर्न स्टील मेटॅलिक, लुनार सिल्व्हर मेटॅलिक, गोल्डन ब्राउन मेटॅलिक.

प्रशस्त गाडी

मध्यम आकारातील सर्वात लांब व रुंद अशी सेदान प्रकारातील कार आहे. लांबी ४५४९ मिमी आणि १७४८ मिमी रुंदी आहे. यात वाढ करण्यात आली आहे. मात्र उंची १४८९ मिमी आणि व्हीलबेस २६०० मीमी असून यात बदल करण्यात आलेला नाही. लांबी व रुंदी वाढविण्यात आल्याने मागील आसनावर तीन प्रवासी सहज बसू शकतात. जमिनीपासूनचे अंतर थोडे कमी असल्याने खडबडीत रस्त्यांवर चालवताना काळजीपूर्वक चालवावी लागते.

उत्साहपूर्ण अनुभव

नवीन होंडा सिटी पेट्रोल आणि डीझेल दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. या गाडीत व्हीटीसीसह नवीन १.५लीटर व्हीटीईसी डीओएससी (VTEC DOHC) पेट्रोल इंजिन आणि भारताचे आकर्षक रीफाइंड १.५ लिटर डीटीइसी (DTEC) डीझेल इंजिन वापरण्यात आले आहे. ते उच्च इंधन कार्यक्षमता देतेच शिवाय कमी उत्सर्जन आणि उत्साहपूर्ण गाडी चालविण्याचा अनुभव देते. ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वरून जात असताना अगदी तिसऱ्या गिअरवर गाडी १२० पर्यंतचा वेग गाठत होती. मात्र वेगमर्यादा ओलांडल्यानंतरही गाडी अगदी सहज चालत असल्याचा अनुभव मिळत होता. तर सहाव्या गिअरवर १६० पर्यंत वेग वाढवला असतानाही कोणताही आवाज न करता गाडी अगदी सहज चालत राहते. आणखी एक वैशिष््टय़ म्हणजे गिअर बदलणे अगदी सहज व सुलभ आहे. कोणत्याही गिअरवर गाडीचा वेग वाढला किंवा एकदम कमी झाला तरी अडथळा येत नाही.