संधिवातावर नवीन औषध शोधून काढण्यात आले असून गुडघ्यांच्या संधिवातावर ते परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे मात्र सांधेदुखीवर मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. यातून हाडांच्या रोगांवरील उपचारात फरक होण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या लीडस विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की, हाडांचा संधिवात हा अतिशय वेदनादायी असतो व त्यामुळे लाखो लोकांचे जीवन यातनामय झालेले आहे. या अवस्थेत शरीरात कुच्र्याच्या बाजूने असलेल्या टोकांपासून वेदना सुरू होतात.

गुडघ्याच्या ठिकाणी या वेदना जास्त तीव्रतेने असतात. अॅसनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधानुसार गुडघ्याचा संधिवात असलेल्या २४४ रुग्णांना यात एमआयव्ही ७११ या औषधाची १०० व २०० मिलीग्रॅमची मात्रा २६ आठवडे देण्यात आली. त्यामुळे वेदना कमी झाल्याचे दिसून आले. याशिवाय एमआरआय चाचण्यात या दुखण्यात बराच फरक दिसून आला. ज्या रुग्णांना औषध दिले नव्हते त्यांच्या तुलनेत हे औषध दिलेल्या रुग्णांच्या हाडात कुच्र्याची हानी कमी दिसून आली.

हाडातील कोलॅगनची हानी कमी झालेली दिसली. संशोधकांच्या मते या औषधावर आणखी संशोधनाची गरज असून रचनात्मक बदल होऊनही हाडांचे दुखणे थांबतेच असे नाही, हे पूर्वीच्या अभ्यासांमधील मत काहीअंशी बरोबर आहे. त्यामुळे हाडांच्या संधिवातावर एमआयव्ही ७११ या औषधाचा परिणाम तपासण्यासाठी आणखी चाचण्या करण्याची गरज आहे.