कुमारवयीन मुलं-मुली आणि तरुणांना धूम्रपानाच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये धूम्रपानविरोधी भावना जागृत करण्यासाठी आता एक नवे स्मार्टफोन अ‍ॅप विकसित करण्यात आलंय.
अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील वर्तणूकशास्त्र विभागातील प्राध्यापक अलेक्झांडर प्रोखोरोव्ह यांनी हे अ‍ॅप डिझाईन केले आहे. ‘टोबॅको फ्री अ‍ॅप’ असे याचे नाव आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कुमारवयीन आणि तरुणांना धूम्रपानाच्या व्यसनापासून परावृत्त केले जाते. त्याचबरोबर व्यसन सुटल्यावर पुन्हा धूम्रपानाकडे आकर्षित होऊ नये, यासाठी काही वर्तणूकविषयक कौशल्येही शिकवली जातात. आमच्या अ‍ॅपमध्ये प्रबोधन आणि मनोरंजन या दोन्हींचा संगम आहे. कॉमिक्स आणि संवादात्मक गेम्सच्या साह्याने या अ‍ॅपच्या माध्यमातून व्यसनग्रस्तांचे प्रबोधन केले जाते, असे प्रोखोरोव्ह म्हणाले.
धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून कुमारांनी आणि तरुणांनी दूर राहावे, यासाठी प्रबोधन केले जाते. आतापर्यंत केवळ शाब्दिक संदेशातून तरुणांना धूम्रपानांच्या धोक्यांबद्दल माहिती दिली जात होती. मात्र, आता या संवादात्मक शैलीतील संदेशांमुळे आणि वर्तणूक कौशल्ये सुधारण्यासाठी दिलेल्या संदेशांमुळे या अ‍ॅपचा व्यसनग्रस्तांना अधिक फायदा होईल, असे प्रोखोरोव्ह यांनी सांगितले.
अ‍ॅपमध्ये अ‍ॅनिमिटेड पात्रे, वैविध्यपूर्ण संगीत यांचा समावेश करण्यात आला आहे. धूम्रपान करणारे आणि न करणारे या दोन्ही गटांतील कुमारांना या अ‍ॅपच्या माध्यमातून संदेश देण्यात आले आहेत.