News Flash

गोव्यात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध

बेडकाच्या नव्या प्रजातीची भर पडली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पश्चिम घाटातील उभयचरांच्या जैवविविधतेमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीची भर पडली आहे. गोवा, पुणे आणि बंगळूरु येथील संशोधकांनी संयुक्तरीत्या ‘फेजेरवा-या गोएंची’ या बेडकाच्या उपप्रजातीचा नव्याने शोध लावला आहे. गोवा राज्यात ही प्रजात आढळून आल्याने संशोधकांनी त्याचे नाव ‘फेजेरवा- या गोएंची’ असे ठेवले असून गोव्याच्या नावाने शास्त्रीय नाव मिळविणारी ‘फेजेरवा’ या बेडकांच्या प्रजातीमधील ही दुसरी पोटजात आहे.

पुण्यातील भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे संशोधक डॉ़  के. पी. दिनेश, गोव्यातील ‘म्हादेई रिसर्च सेंटर’चे संशोधक निर्मल कुलकर्णी, बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स सेंटर’च्या संशोधिका प्रियांका स्वामी आणि बंगळूरुच्या ‘माउंट कार्मेल कॉलेज’चे पी. दीपक यांच्या नेतृत्वाखाली ‘फेजेरवा’ या गटातील ‘फेजेरवा-या गोएंची’ या मोठय़ा बेडकावर संशोधन केले आहे. नव्याने संशोधित झालेल्या या बेडकाचा आकार ४१ ते ४६ मि.मी आहे. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया खंडातील ‘फेजेरवा’ या बेडकांच्या प्रजातीमध्ये अनेक उपजाती आहेत. मात्र बाह्य़रूपात साधम्र्य असल्याने केवळ शारीरिक रचनेवरून त्यांना ओळखणे कठीण जाते. त्यामुळे बाह्य शारीरिक रचना, भौगोलिक अधिवास आणि रेण्वीय पद्धतीने संशोधकांनी या नव्या उपजातीचे निरीक्षण केले. या जातीच्या बेडकांचे भौगोलिक अस्तित्व आणि जैवशास्त्र समजून घेण्यासाठी अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत संशोधक निर्मल कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात मांसासाठी मोठय़ा प्रमाणात बेडकांची हत्या होत असल्याने तिथे बेडकांच्या हत्येवर र्निबध आहेत. शिकारीमुळे येथील बेडकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर नव्याने शोधलेल्या बेडकाची प्रजात येथील जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली आहे. फेजेरवा-या गोएंची बेडूक गोव्यात भातशेती, पाणथळीवर तसेच कातळांच्या उंच पठारांवर मोठय़ा प्रमाणात आढळतो. मोठय़ा आकाराच्या उभयचर बेडकाची ही जमात पावळ्यात संध्याकाळी किंवा रात्री एखाद्या चिखतळ्यापाशी ओरडतानाचे निरीक्षण संशोधकांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:04 am

Web Title: new species of frogs in goa
Next Stories
1 प्रदूषणामुळे लहान मुलांना दम्याचा धोका
2 व्हॉट्सअॅपच्या व्हिडीयो कॉलिंगमध्ये आणखी एका फिचरचा समावेश
3 लवकर वजन कमी करायचंय? या गोष्टी आवर्जून करा
Just Now!
X