‘एमआयटी’ या अमेरिकी संस्थेच्या वैज्ञानिकांनी एकाच टोचणीत बालकांना सर्व लशी देता येतील, असे महाइंजेक्षन तयार करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्रिमिती रचनात्मक पद्धत असे त्याचे नाव असून त्यात एकाचवेळी सर्व लशी देता येतील. यात नवीन सूक्ष्मकणांचा वापर केला असून यात कॉफी कपसारखी रचना असून त्या सूक्ष्म कपात लशीचे औषध ठेवून तो बंद केला जाईल. हे लसवाहक कप जैवअनुकूल घटकांचे असतील व विशिष्ट काळाने त्यांचे विघटन होईल, अर्थात त्याआधी लस शरीरात सोडलेली असेल. सूक्ष्ण कपांच्या माध्यमातून या लशी एकाच टोचणीत देता येतील, त्यामुळे वारंवार इंजेक्षन देण्याची वेळ येणार नाही, असे एमआयटीचे प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांनी सांगितले. गरीब रूग्ण असलेल्या देशांना या इंजेक्षनचा फायदा होईल असा दावा यात करण्यात आला आहे. जर्नल सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. विकसनशील देशातील बालकांना सर्व लशी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी दिल्या जातात, त्या वेळी याचा फायदा होईल. लस वाहून नेण्यासाठी फोटोलिथोग्राफी तंत्र वापरून पातळ पडद्याचे कप तयार केले असून त्यात सिलिकॉनचा वापर केला आहे. एका काचेच्या पट्टीवर असे दोन हजार सूक्ष्म कप मावतात. ते पीएलजीए या विघटनशील बहुलकाचे बनलेले आहेत. औषधाची गळती न होता शरीरात गेलेल्या या जैविक  कपातून ९, २० व ४१ दिवसांनी औषध सोडले जाईल. हे प्रयोग उंदरात यशस्वी झाले आहेत. ओव्लबुमिन हे अंडय़ाच्या पांढऱ्या भागात आढळणारे प्रतिकार शक्तीस उत्तेजन देणारे प्रथिन या पद्धतीने शरीरात सोडण्यात आले. हजार दिवसांनी औषध शरीरात सोडले जाईल असे कपही यात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे एकदाच सर्व लशी दिल्या जातील त्या या कपमध्ये असतील व विशिष्ट काळाने शरीरात सोडल्या जातील, त्यामुळे वारंवार टोचावे लागणार नाही.