21 October 2018

News Flash

‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्णांसाठी नवी उपचारपद्धत

एचआयव्हीग्रस्त रुग्णांना आठवडाभरातील औषधांची मात्रा एकाच वेळी देता येईल

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एचआयव्हीग्रस्त रुग्णांना आठवडाभरातील औषधांची मात्रा एकाच वेळी देता येईल अशा प्रकारची कॅप्सुल संशोधकांनी विकसित केली आहे. एचआयव्हीग्रस्त रुग्णांना विविध प्रकारची औषधे एकत्रितपणे घ्यावी लागतात. अशा वेळी औषधांच्या वेळापत्रकाचे पालन करणे कठीण होते. तर या कॅप्सुलमुळे रुग्णांना फायदा होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्था (एमआयटी) येथील संशोधकांनी ही कॅप्सुल विकसित केली आहे. या नव्या उपचार पद्धतीमुळे रुग्णांकडून औषधांच्या वेळापत्रकाचे पालन केले जाणार असून एचआयव्ही संसर्गाचा धोका असणाऱ्यांना या औषधामुळे मदत होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले. औषध घेण्याच्या वेळापत्रकाचे पालन न करणे हा एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या उपचारातील मुख्य अडथळा आहे. असे ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील जैववैदय़क अभियंता जियोव्हानी ट्रॅव्हर्सो यांनी म्हटले. औषधांची मात्रा कमी केल्याने औषधे घेण्याचे वेळापत्रक पाळण्यास मदत होणार असून हे रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे  ट्रॅव्हर्सो यांनी म्हटले. या कॅप्सुलची रचना तारा माशासारखी असून यात सहा विभाग आहेत. औषध घेतल्यांनतर प्रत्येक भाग उलगडत जाऊन शरीरात औषध सोडतो.

कॅप्सुलची कार्यक्षमता पडताळण्यासाठी केलेल्या प्रयोगात एका आठवडय़ात तीन वेगवेगळ्या प्रकारची औषधे या कप्सूलमधून यशस्वीपणे देण्यात आली. संशोधकांनी वॉशिंग्टनमधील डिसिज माडेलिंग इन्स्टिटय़ूट सोबत काम करीत आठवडय़ातून केवळ औषधाची केवळ एकच मात्रा घेतल्याने एचआयव्हीबाधितांवर काय परिणाम होणार याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला.

दैनंदिन औषध घेतल्यापेक्षा आठवडय़ातून एकदा औषध घेतल्यास एचआयव्ही प्रतिबंधक उपचारात २० टक्क्यांनी सुधारणा होत असल्याचे संशोधकांना आढळले. हा अभ्यास नेचर कम्युनिकेशन्स् या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

First Published on January 12, 2018 1:09 am

Web Title: new treatment system for hiv patients