सौंदर्य प्रसाधनांमधील अविभाज्य घटक म्हणजे लिपस्टिक. कोणताही सण-समारंभ असो किंवा बाहेर फिरायला जाणं असो आजच्या महिला लिपस्टिक लावल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. थोडक्यात काय मेकअप करताना इतर वस्तू नसतील तरी चालेल परंतु लिपस्टिक हवी म्हणजे हवीच. या लिपस्टिकमध्ये सुद्धा अनेक शेड्स असतात. अनेक वेळा आपण लिपस्टिक घ्यायला गेल्यावर गोंधळून जातो. कोणती लिपस्टिक कधी लावायची, कोणती शेड कशावर खुलून दिसेल हे माहित नसेल तर आपल्या सौंदर्यात बाधा येते. त्यामुळे लिपस्टिक घेताना काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. अनेक तरुणी मॅट,ग्लॉसी या सारख्या लिपस्टिकला पसंती देतात. त्यातच आता बाजारात निरनिराळ्या रंगाच्या, स्टाइल्सच्या लिपस्टिक आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात लिपस्टिकविषयी आणि त्यांच्या निरनिराळ्या शेड्सविषयी –

१.क्रिमझन, नारंगी आणि मजेंडा शेड्स –
लिपस्टिकच्या ट्रेण्डमधून कधीही बाद न होणारा रंग म्हणजे लाल. पण या लाल रंगाच्या कोणत्या शेड्ची निवड करायची हे देखील पाहणं गरजेचं आहे. सध्या बाजारात थोडीशी गडद रंगाची क्रिमझन शेड आली आहे. हा रंग कोणत्याही स्कीनटोन्सवर उठून दिसतो.मुख्य म्हणजे तुमचा मूड कितीही पडलेला असू देत, क्रिमझन शेड चेहऱ्याला उठाव देते. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा चेहरा फ्रेश दिसतो. रात्री पार्टीसाठीही तुम्ही हा लीपकलर सहज वापरू शकता. गुलाबी रंगात किंचित जांभळ्या रंगाची छटा असलेला मजेंडा रंगसुद्धा लिपस्टिक शेडमध्ये पुढे आहे. नेहमीच्या गुलाबी लिपस्टिकला पर्याय शोधत असाल, तर ही शेड नक्की वापरून बघा. या वेळी चर्चेत असलेला लीपकलर नारंगी आहे. फ्रेश, कलरफुल समर लुकसाठी हा शेड उत्तम आहे. उजळ पण अतिब्राइट नसलेला हा शेड कॉलेज किंवा ऑफिस लुकवर छान दिसतो.

२. ट्रेण्डी पेस्टल शेड्स –
कान्स फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने लावलेल्या पर्पल लिपस्टिकची अनेकांनी खिल्ली उडवली होती. तिच्यावर टीकाही केली होती. मात्र सध्या याच लिपस्टिकचा कलर इन आहे.यंदा लाइट ब्ल्यू, पर्पल, पोपटी, बेबी पिंक, लेमन यल्लो असे हटके लीपकलर्स बाजारात दाखल झाले आहेत. एखाद्या पार्टीसाठी थोडा वेगळा लुक ट्राय करायचा असेल, तर या शेड्स वापरता येऊ शकतात.

३.ग्लिटर इफेक्ट –
ग्लॉसी आणि मॅट यापलीकडे जात सध्या लिपस्टिकचा नवा प्रकार चर्चेत आहे, तो म्हणजे ग्लिटर इफेक्ट. नेहमीच्या लीप कलरला उठाव देण्यासाठी वेगवेगळ्या ग्लिटरचा वापर यामध्ये केला जातो. नव्या शेडमध्ये खर्च करायचा नसल्यास ग्लिटर ग्लॉससुद्धा बाजारात मिळतात. नेहमीच्या लिपस्टिकवर हा ग्लॉस वापरू शकता. सोनेरी, चंदेरी आणि वेगवेगळ्या रंगांच्या ग्लिटरसोबतच मल्टीकलर ग्लिटरसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.