टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून देशभरात वाहनचालकांना ‘फास्टॅग’ (FASTag) बंधनकारक करण्यात आले आहे. अशातच खोटे फास्टॅग विकले जात असल्याचे काही प्रकार समोर येत असून ‘नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने'(NHAI) फास्टॅगबाबत लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

खोट्या FASTag ची विक्री :-
खोट्या FASTag पासून सतर्क राहण्याचं आवाहन NHAI ने नागरिकांना केलं आहे. “काहीजण फसवणूक करुन ऑनलाइन खोटे FASTag विकत आहेत. हे FASTag दिसायला अगदी NHAI/IHMCL च्या फास्टॅगप्रमाणेच आहेत. पण हे खोटे FASTag टोलनाक्यांवर काहीही कामाचे नाहीत, कारण त्या फास्टॅगद्वारे तुम्हाला टोलप्लाझा ओलांडून जाण्याची परवानगी मिळू शकत नाही”, असा इशारा NHAI ने दिला आहे.

फक्त इथून खरेदी करा FASTag :-
लोकांनी खरा FASTag खरेदी करण्यासाठी http://www.ihmcl.co.in या वेबसाइटवर क्लिक करावं किंवा MyFastag App चा वापर करावा, असंही NHAI कडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय युजर्स एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा २३ नामांकित बँकांच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येतो. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि माय फास्टॅग अ‍ॅपवरही सुविधा उपलब्ध आहे.

दुप्पट टोल :-
१५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागत आहे.

..तर थर्ड पार्टी इन्शुरन्स नाही :-
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. परंतु ज्या वाहनचालकांकडून याची अंमलबजावणी होत नसेल, त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जाणार नाही. एप्रिल २०२१ पासूनही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार मंत्रालयाकडून होत आहे.

नियमावली कोणती?

* फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

* एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

* डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

* टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.