26 February 2021

News Flash

मॅग्नाईट.. खडतर मार्गावरही सुसाट

ही कार चालविल्यानंतर काही कमतरता जाणवते, मात्र किमतीचा विचार करता ती समाधान देते.

(संग्रहित छायाचित्र)

बापू बैलकर

मॅग्नाईट..साडेपाच ते दहा लाखांपर्यंतच्या परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असून तुलनेत इंधनही कमी पिते. अनेक सुविधांनी परिपूर्ण असून ‘एसयूव्ही’ चालविण्याचा सर्वोच्च अनुभव देत नाही, मात्र निराशाही करीत नाही. त्यामुळे परवडणाऱ्या ‘एसयूव्ही’ कारच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी एकमेव नाही, पण एक पर्याय असू शकतो.

चित्रपटाचे यश हे त्याच्या पहिल्या प्रयोगाला किती गर्दी खेचते यावर अवलंबून असते, तोच यशाचा फंडा वाहनांसाठीही लागू होतो. गेल्या वर्षअखेरीस निस्सान इंडियाने आपली मध्यम आकारातील एसयूव्ही मॅग्नाईट बाजारात आणली आणि एसयूव्ही प्रकारात परवडणाऱ्या पर्यायाच्या शोधात असलेल्या ग्राहकांची मनं जिंकली. मात्र ही कार प्रत्यक्षात चालवल्यानंतर ती परीक्षेस खरी उतरली का? तर होय. ती खरेदीदारांची निराशा करीत नाही. ही कार चालविल्यानंतर काही कमतरता जाणवते, मात्र किमतीचा विचार करता ती समाधान देते.

‘मॅग्नाईट’ची टबरे इंजिन मॅन्युअल कारची आंम्ही नुकतीच टेस्ट ड्राइव्ह घेतली. ही कार नवी मुंबईतील शहरातील रस्त्यांसह मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पुणे-सातारा महामार्ग तसेच भोर तालुक्यातील डोंगर उतार व खराब रस्त्यांवर चालवली. या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर ती तेवढय़ाच शक्तिनिशी चांगला अनुभव आणि समाधान देते.

दिसायला आकर्षक, पेट्रोल व डिझेल इंजिन पर्याय, जमिनीपासूनचे अंतर जास्त, आरामदायी.. इंटिरिअरवर भर, मोठे टचस्क्रीन डिस्प्ले, चारही दिशेने कॅमेरे, अत्याधुनिक म्युझिक सिस्टीम, स्पोर्टी दिसण्यावर भर, पार्किंग सेन्सर, ऑटोमॅटिक टायर प्रेशर चेक, ब्लू लिंक सिस्टीम ही एसयूव्ही प्रकारातील कारची वैशिष्टय़ अलीकडे कार खरेदीदारांना आकर्षित करीत आहेत. वर्षांनुवर्षे हॅचबॅक प्रकारातील कार वापरून कंटाळलेल्या ग्राहकांचा कल हा ‘एसयूव्ही’कडे वळला आहे. मात्र या कारच्या किमती परवडणाऱ्या नसल्याने हा वर्ग पर्यायाच्या शोधात असताना निस्सान इंडियाने या तंत्रस्नेही ग्राहकांच्या आशाआकांक्षांचा विचार करीत आपली मॅग्नाईट भारतीय वाहन बाजारात आणली. आगदी दहा लाखांच्या आत किंमत जाहीर करीत त्यांनी या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांची मागणी खेचण्यात यश मिळवले आहे.

मॅग्नाईटमध्ये एसयूव्ही प्रकारातील कारमध्ये असलेली सर्व वैशिष्टय़ देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही मोजक्या सुविधा देणे टाळले आहे. जसे की या कारमध्ये सनरूप दिलेले नाही. फक्त पेट्रोल इंजिन हा एकच पर्याय उपलब्ध आहे. पुढील पार्किंग सेन्सर नाही. या काही कमी या कारमध्ये जाणवतात, मात्र किमतीचा विचार केला तर त्या दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत. कंपनीने जास्तीत जास्त ग्राहकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करताना कारमध्ये वापरलेल्या साहित्याच्या दर्जाबाबतही थोडासा हात आखडता घेतला आहे.

मॅग्नाईट..ही मोठी, बोल्ड, सुंदर आणि आकर्षक एसयूव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र ती बोल्ड आणि सुंदर आहे, आकर्षितही करते, मात्र चार मीटर एसयूव्ही प्रकारातील इतर कारच्या तुलनेत तिची लांबी, रुंदी किंचित कमी आहे. जमिनीपासूनचे अंतरही थोडे कमी आहे. मात्र अगदी खराब व डोंगर उतारावर चालवतानाही कुठे याची जाणीव होत नाही. अगदी वर्दळीच्या वाहतूक कोंडीतही ही गाडी अगदी सहज अनुभव देते.

मॅग्नाईटमध्ये १.० लिटर इ4ऊ नैसर्गिक प्रेरणा असलेले पेट्रोल इंजिन, ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह व १.० लिटर HRAO टबरे पेट्रोल इंजिन, ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन हे दोन इंजिन पर्याय दिले आहेत. आंम्ही यातील टबरे पेट्रोल इंजिन असलेली ५ स्पीड मॅन्युअल ही कार चालवली. कपंनीने दावा केल्याप्रमाणे गाडी कमी वेगातही अधिक न्यूटन मीटरचा टॉर्क देते. तीस सेकंदात ० ते १०० पर्यंतचा वेग गाडी पकडत असून ३,६०० आरपीएमपर्यंत १०० पीएसची ताकद व १५० न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. एक हजार आरपीएमनंतर गाडी चांगला वेग पकडते व ५ हजार आरपीएमनंतर ती समाधान देते. पहिल्या गिअरवर ५०, दुसऱ्या गिअरवर ९५ पर्यंत तर तिसऱ्या गिअरवर अगदी १३० ताशी किलोमीटपर्यंतचा वेग सहज पकडते. गाडीचा सर्वोच्च वेग अगदी ताशी १७० किलोमीटपर्यंतचा आहे. मात्र जास्तीत जास्त १२० ते १३० पर्यंतच्या वेगापर्यंत गाडी अगदी सहज चालविल्याचा अनुभव मिळतो. खराब रस्त्यांवर १२ ते १३, शहरात १४ ते १५ व महामार्गावर १७ ते १८ पर्यंतचे मायलेज मिळते.

गाडीत निस्सान जीटी-आर यासारख्या ‘मिरर बोअर सिलिंडर कोटिंग’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे इंजिनाच्या आतील घर्षण कमी होते आणि वेग वाढवणे अगदी सहज होते. मात्र गाडी कमी वेगात असताना थोडा आवाज जाणवतो. ब्रेकिंगप्रणालीही चांगली आहे. देखभालीचा खर्च अगदी कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे एकूण वाहन चालविण्याचा अनुभव पाहता ही गाडी एसयूव्ही चालविण्याचा सर्वोच्च अनुभव देत नाही, मात्र निराशही करीत नाही.

विविध पर्याय उपलब्ध

’ ई (बेस) : यात १६ इंची चाके, स्किड प्लेट्स, फंक्शनल रूफ रेल्स, ३.५ इंची एलसीडी क्लस्टर, सर्व पॉवर विंडो आणि डय़ुअल टोनमधील अंतर्गत सजावट.

’ एक्सएल (मिड) :  यात एकात्मिक ऑडिओसाठी ६ स्पीकर्स, सुकानूमध्ये ऑडिओचे नियंत्रण, वातानूकुलीन यंत्रणा व बाहेरील आरसे स्वयंचलीत चालू बंद करता येतात.

’ व्ही (हाय)  : यात १६ इंची डायमंड कट अलॉय, एलईडी दिवे (डीआरएल) आणि फॉगलॅम्प्स, ८ इंची फ्लोटिंग टच स्क्रीन (वायरलेस अ‍ॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह), ७ इंची टीएफटी मीटर, व्हॉईस रेकग्निशन, रीअल व्ह्यू कॅमेरा आणि बटन स्टार्ट.

’ व्ही (प्रीमिअम) : ही गाडी एलईडी बाय-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, क्रुझ कंट्रोल, ३६० डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर आणि पूर्णपणे स्पोर्टी अतंर्गत व बाहेरील रचना आहे.

’ तंत्रस्नेही ग्राहकांसाठी निस्सान ‘टेक पॅक’ हा पर्याय वैकल्पिक ठेवला आहे. यात वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, सुयोग्य मूड लायटिंग, पडल लॅम्प्स आणि जेबीएलचे हायएंड स्पीकर अशा सुविधा आहेत.

कोणत्या सुविधा नाहीत

’ साहित्याचा दर्जा मध्यम प्रकारातील

’ सनरूप नाही

’ पुढील पार्किंग सेन्सर नाही.

’ गाडीत फक्त चालक व सहप्रवाशी यांच्यासाठी दोनच एअरबॅग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 12:05 am

Web Title: nissan magnite suv zws 70
Next Stories
1 रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा, व्होडाफोन-आयडियाने आणली धमाकेदार ऑफर
2 स्वस्त झाला Samsung Galaxy M21, ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरी; जाणून घ्या नवी किंमत
3 तुमच्याकडचं FASTag ‘फेक’ तर नाही ना?, NHAI ने दिली ‘वॉर्निंग’
Just Now!
X