शहरांतील ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांच्या श्रवणक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. या अभ्यासानुसार ग्वांगझौ, नवी दिल्ली, कैरो आणि इस्तंबुल या शहरांचा समावेश सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असलेल्या शहरांत झाला. तर झुरिक, व्हिएन्ना, ऑस्लो आणि म्युनिक या शहरांत ध्वनिप्रदूषण कमी असल्याचे दिसून आले. तसेच या शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या सम प्रमाणात नागरिकांच्या श्रवणक्षमतेवरही परिणाम झाल्याचे आढळले.

शहरांतील वाहनांच्या रहदारीचा, भोंग्यांचा आवाज हा ध्वनिप्रदूषणास प्रामुख्याने हातभार लावतो. त्यामुळे अशा  ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या कानांवर हा सतत आघात झाल्याने त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होते, असा निष्कर्ष जर्मनीतील मिमी हिअरिंग टेक्नॉलॉजीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हेन्रिक मथायस यांनी काढला आहे. त्यांचे निष्कर्ष यासंबंधी अन्य अभ्यासांशीही मिळतेजुळते आहेत. त्यांच्या कंपनीने २ लाख लौकांकडून मोबाइल फोनवर ही माहिती संकलित केली. त्याच्या विश्लेषणातून ही बाब लक्षात आली.  मात्र ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम केवळ या एकाच कारणाने होत नाही. जंतुसंसर्ग, जनुकांसंबंधी विकार, मुदतपूर्व जन्म, काही औषधांचा परिणाम यामुळेही श्रवणक्षमता बिघडू शकते, असे संशोधकांनी सांगितले. स्टोकहोम, सोल, अ‍ॅमस्टरडॅम, स्टुटगार्ट या शहरांत ध्वनिप्रदूषण कमी होते, तर शांघाय, हाँगकाँग, बार्सिलोना या शहरांत ध्वनिप्रदूषण अधिक होते.