नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबलने भारतात लेटेस्ट फीचर फोन Nokia 5310 लाँच केला आहे. हा फोन म्हणजे 2007 मध्ये आलेल्या ‘Nokia 5310 एक्सप्रेस म्युझिक’ या लोकप्रिय फोनचं पुनरागमन मानलं जात आहे. 3 हजार 399 रुपये इतकी या नव्या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीने हा फोन मार्च महिन्यातच लाँच केला होता.

ड्युअल सिम सपोर्ट असलेला Nokia 5310 हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 22 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो असा दावा कंपनीने केला आहे. नोकिया इंडिया ऑनलाइन स्टोअरवर आजपासून या फोनच्या प्री-बुकिंगलाही सुरूवात झाली असून  22 जुलैपासून हा फोन ऑफलाइन रिटेलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनमध्ये ड्युअल स्पीकर असून मागील बाजूला एक कॅमेरा सेंसर आणि एक एलईडी फ्लॅशही आहे. हा फोन व्हाइट/रेड आणि ब्लॅक/रेड अशा दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. पहिल्यांदा, ‘Nokia 5310 एक्सप्रेस म्युझिक’ हा फोन कंपनीने 2007 मध्ये आणला होता. त्यावेळी म्युझिक लव्हर्समध्ये हा फोन चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

फीचर्स :-  नवीन नोकिया 5310 फोनमध्ये KaiOS सॉफ्टवेअरऐवजी Nokia Series 30+ ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. नव्या नोकिया 5310 फोनमध्ये म्युझिक प्लेयरसाठी कंपनीने जुन्या फोनप्रमाणेच नवीन फोनच्या साइडलाही बटणही आहे. 2.4 इंच QVGA स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये अल्फान्युमरिक की-पॅड आहे. फोनच्या मागील बाजूला फ्लॅशसह VGA कॅमेरा देण्यात आलाय. नवीन Nokia 5310 मध्ये 16MB इंटरनल स्टोरेज असून फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉटही आहे. याद्वारे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येईल. म्हणजे जवळपास 8,000 गाणी यामध्ये स्टोअर करता येतील. जुन्या फोनमध्ये 4GB स्टोरेजपर्यंतच क्षमता वाढवता येत होती. तसेच, नवीन फोनमध्ये MP3 प्लेयर आणि फ्रंट फेसिंग स्टीरिओ स्पीकर्स असून 3.5mm ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ 3.9 देण्यात आले आहे. याशिवाय FM रेडिओ रिसीव्हरही आहे. या फोनमध्ये 1,200 mAh क्षमतेची रिमूव्हेबल बॅटरी असून ही दमदार बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. सिंगल चार्जमध्ये 7.5 तासांचा टॉकटाइम, सिंगल सिम मोडमध्ये 22 दिवस आणि ड्युअल सिम मोडमध्ये 30 दिवस स्टॅडबाय टाइम बॅकअप मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.