दुबईतील एका कार्यक्रमात एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला Nokia 8.1 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. मध्यपूर्वेत या स्मार्टफोनसाठी विक्रीपूर्व नोंदणीही सुरु झाली असून लवकरच हा स्मार्टफोन भारतातही उपलब्ध केला जाणार आहे. 10 डिसेंबर रोजी कंपनीने दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यामध्ये Nokia 8.1 लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. यामध्ये 6.18 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आलाय, आणि स्नॅपड्रॅगन 710 हा वेगवान प्रोसेसरही आहे. याच्या मागील बाजूला 12 आणि 13 मेगापिक्सल क्षमतेचा एलईडी फ्लॅशसह ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे. शिवाय, सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. अॅन्ड्रॉइड ओरियो 8.1 वर कार्यरत असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 3,400 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आलीये. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VolTe, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो युएसबीचा पर्याय आहे. या स्मार्टफोनची युरोपमध्ये किंमत 399 युरो म्हणजे जवळपास 32 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुबईत याची किंमत 1,499 दिरहम म्हणजे जवळपास 29 हजार रुपये ठेवण्यात आलीये. भारतात या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाण्याची शक्यता आहे.