तब्बल 5 रिअर कॅमेरे असलेला Nokia 9 PureView हा स्मार्टफोन भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलाय. आजपासून हा स्मार्टफोन ऑफलाइन म्हणजेच मोबाईलच्या दुकानांमधून देखील खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत केवळ फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या संकेतस्थळावरच या फोनची विक्री सुरू होती.

10 जुलै रोजी नोकियाचा हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला पाचही कॅमेरे हे प्रत्येकी 12 मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. यातील तीन मोनोक्रोम तर दोन आरजीबी या प्रकारातील कॅमेरे आहेत. यातील तीन कॅमेरे हे उभ्या रांगेत तर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक असे पाच कॅमेरे देण्यात आलेले आहेत. या सर्व कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.  एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि आर्टीफिशियल इंटिलेजंसच्या मदतीने यातून घेतलेली प्रतिमा ही तुलनेत अधिक सजीव वाटेल असं कंपनीने म्हटलं आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी 20 मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा क्वाड HD+ POLED डिस्प्ले असून इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर देण्यात आलं आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 845 हा प्रोसेसर दिलेला आहे.  यात  वायरलेस चार्जिंग सपोर्ट असून  3320 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  हा स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉइड वन या प्रोग्रॅमच्या अंतर्गत लाँच करण्यात आला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे.

किंमत –

नोकिया 9 प्युअर व्ह्यू या मॉडेलचे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019मध्ये अनावरण करण्यात आले होते. या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये इतकी असून लिमिटेड ऑफर अंतर्गत ग्राहकांना 5 हजारांचे गिफ्ट कार्ड मिळणार आहे. हा भारतातील नोकियाचा सर्वात महागडा फोन असल्याचं म्हटलं जात आहे. केवळ मिडनाइट ब्लॅक या रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.