X

अबब…आता नोकियाचा पाच कॅमेरे असलेला स्मार्टफोन

या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला सात सेन्सर दिसत आहेत. यातील तीन कॅमेरे हे उभ्या रांगेत तर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक असे एकूण पाच कॅमेरे

एकेकाळी मोबाईल क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली नोकिया कंपनी लवकरच ५ कॅमेरे असलेला स्मार्टफोन घेवून येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या नोकिया या ब्रँडची मालकी एचएमडी ग्लोबल या कंपनीकडे आहे. एचएमडी ग्लोबलचा आगामी स्मार्टफोन नोकिया 9 चे काही फोटो लिक झाले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये पेंटा कॅमेरा सेटअप अर्थात पाच कॅमेर्‍यांचा सेटअप असण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, नोकिया 9 बाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

इंटरनेटवर लिक झालेल्या फोटोनुसार या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला सात सेन्सर दिसत आहेत. यातील तीन कॅमेरे हे उभ्या रांगेत तर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक असे एकूण पाच कॅमेरे देण्यात आलेले आहेत. तसंच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी पुढील बाजूला एक कॅमेरा देण्यात आला आहे. म्हणजेच एकूण सहा कॅमेरे या फोनमध्ये असतील. याशिवाय, एलईडी फ्लॅश आणि इन्फ्रारेड सेन्सरही यासोबत देण्यात येणार आहेत. हा सर्वात नवा प्रयोग ठरेल कारण यापूर्वी ३ व चार कॅमेरेवाले फोन आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये थ्रीडी फेस अनलॉक हे फिचरदेखील असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. डिस्प्लेबाबत थोडा संभ्रम आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.9 किंवा 6.01 इंच आकारमानाचा आणि क्वॉड एचडी डिस्प्ले असेल आणि याला गोरिला ग्लास 5 चं कवच असू शकतं. फोनमध्ये तब्बल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असेल अशी चर्चा आहे. वर्षअखेरपर्यंत हा स्मार्टफोन बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे.