साधारणत: लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या डोळ्यांच्या कॅन्सरचे निदान आता स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याने करता येणे शक्य झाले आहे. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये डोळ्यांचा कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठे असते. अशा मुलांसाठी काम करणाऱ्या ब्रिटनमधील एका संस्थेने स्मार्टफोन कॅमेऱ्याने डोळ्यांचा कॅन्सर ओळखता येऊ शकतो, असा दावा केला आहे. या संस्थेच्या मते स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश ‘रेटिनोब्लास्टोमा’ या दृष्टीपटलावरील पेशींच्या कॅन्सरची सहजपणे ओळख करू शकतो. या कॅन्सरमध्ये डोळ्यांच्या पडद्यावर ट्युमरची वाढ होते.
जर एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यांमध्ये कॅन्सरचा ट्युमर वाढत असेल तर फ्लॅशच्या सहाय्याने छायाचित्र काढताना त्या मुलाच्या डोळ्यांच्या बुबुळाभोवतीचा पांढऱ्या रंगात चमकताना दिसतो. त्यामुळे कॅन्सरचे लवकरात लवकर निदान होऊन उपचारांना सुरूवात करता येऊ शकते. जेणेकरून मुलांची दृष्टी गमावण्याची शक्यता कमी होते. काही दिवसांपू्र्वीच ब्रिटनमध्ये चार महिन्यांच्या ऑर्वेन या लहान मुलीला डोळ्याचा कॅन्सर झाल्याचे निदान स्मार्टफोनने करण्यात यश आले होते. त्यामुळे तिच्यावरील उपचारांना योग्य वेळेत सुरूवात करता आली होती. त्यानंतर ऑर्वेन कॅन्सरमधून पुर्णत: बरी झाली होती. लहान मुलांच्या डोळ्यांतील बुबुळाभोवतीचा भाग पांढऱ्या रंगाचा दिसल्यास कॅन्सर होईलच, असे नाही. मात्र, अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य असल्याचे संबंधित संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.