लहान मुलांना अतिसार झाल्यावर त्याचे तातडीने निदान होऊन उपचार सुरू होणे आवश्यक असते. अतिसाराचे निदान लवकरात लवकर व्हावे, यासाठीच इंग्लंडमधील संशोधकांनी ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ ही नवी पद्धत विकसित केली आहे. याच्या साह्याने केवळ वास घेऊन एखादया बाळाला अतिसाराच्या जीवाणूची लागण झाली आहे किंवा नाही, याचा शोध घेता येईल. अतिसार होणाऱया जीवाणूची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने त्यावर उपचारही सुरू करता येणार आहेत. इंग्लंडमधील लेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी या पद्धतीचा शोध लावला आहे. भविष्यात अशा पद्धतीने केवळ वास घेऊन त्यातून विविध आजारांचे निदान करता येईल, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केला आहे.
ज्या जीवाणूमुळे अतिसाराची लागण होते, त्याचा विशिष्ट स्वरुपाचा वास असतो. तो वास मास स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाच्या साह्याने घेतल्यास कोणत्या जीवाणूची लागण झाली आहे, याचे निदान करता येईल. एखाद्याला नेमकी कोणत्या जीवाणूची लागण झाली आहे, याचा शोध या उपकरणामुळे डॉक्टरांना घेता येईल आणि त्यापद्धतीने उपचार सुरू करता येईल. यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता असते, असे मार्था क्लॉकी यांनी सांगितले. ते विद्यापीठातील संसर्गजन्य आजार संशोधन विभागात कार्यरत आहेत.