जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलने नुकतीच एका महत्त्वाच्या गोष्टीची घोषणा केली आहे. सामान्यांना कधी घर घेण्यासाठी, कधी गाडी घेण्यासाठी तर कधी शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी आता गुगल मदतीला धावून येणार आहे. विशेष म्हणजे हे लोन तुम्हाला घरबसल्या मिळू शकणार आहे. गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट या कंपनीकडून ही सुविधा दिली जाणार आहे. यासाठी अल्फाबेटने ४ भारतीय बँकांशी करार करणार आहे. त्यामुळे आता कर्ज मिळण्याचा सोपा आणि चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे. यासाठी फार मोठी प्रक्रिया नसून काही सेकंदांमध्ये हे कर्ज मान्य होणार असल्याचेही गुगलकडून सांगण्यात आले आहे. अल्फाबेट ही मूळ अमेरिकेची कंपनी असून देशात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन कर्जाच्या बाजारात कंपनीला स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे. लहान रक्कम कर्ज म्हणून हवी असल्यास ग्राहकांना कागदपत्रांची मोठी प्रक्रिया पूर्ण करणे आवडत नाही. त्यामुळे लोक ऑनलाईन कर्जाचा पर्याय स्वीकारणे पसंत करतात. यासाठी ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट तपासण्याचीही आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Google for India 2018 (गुगल फॉर इंडिया) चं चौथं एडिशन आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गुगलने भविष्यातील योजनांबाबत अनेक घोषणा केल्या. यामध्येच या कर्जाच्या नव्या सुविधेबाबत सांगण्यात आले. भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३९ कोटी असल्याचे सांगतानाच गुगलने प्रत्येक इंटरनेट वापरणाऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी आणखीही अनेक नवीन फिचर्स लॉन्च केल्या आहेत. यामध्ये गुगल असिस्टंट मराठी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये काम करेल. तसेच आपल्या रेल्वेचे लोकेशन तुम्हाला समजू शकणार आहे. याशिवाय गुगल पे, अँड्रॉईड पाय, गुगल गो अशा अनेक सुविधा मिळणार आहेत.