Paytm हे सध्या सर्वच वयोगटांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे पेमेंट अॅप आहे. अगदी एखादे छोटे पेमेंट करण्यापासून ते मोठे बिल भरण्यापर्यंत अनेक कामे या अॅपच्या माध्यमातून केली जातात. हे अॅप वापरणे सोपे असल्याने अतिशय कमी वेळात ग्राहकांचाा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे अॅप आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जात असल्याने ते अधिकाधिक सुरक्षित असणे गरजेचे आहे. हाच विचार करुन कंपनीने सुरक्षेच्यादृष्टीने एक विशेष सुविधा देणारे फिचर लाँच करण्याचे ठरवले आहे. सध्या या फिचरवर काम सुरु असून लवकरच ते ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे. फेस लॉगइनची सुविधा असणारे हे फिचर दाखल झाल्यास अॅप अधिक सुरक्षित होणार आहे.

ग्राहकांनी केवळ अॅप सुरु करुन त्यामध्ये पाहिल्यास त्यांचे लॉगइन होणार आहे. त्यामुळे तुमचे पेटीएम अकाऊंट तुमच्याशिवाय इतर कोणीही लॉगइन करु शकणार नाही. याआधी काहीवेळा पेटीएमचा वापर करुन चुकीचे व्यवहार झाले होते. तसे यापुढे होऊ नये यासाठी या फिचरचा चांगला उपयोग होणार आहे. कंपनीने आतापर्यंत १० हजार चेहऱ्यांची चाचणी घेतली असून ती यशस्वी झाल्याचे सांगितले. सध्या अँड्रॉईडच्या बीटा अॅपवर या फिचरची चाचणी सुरु असून लवकरच ते वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे.