वाढत्या वयामुळे चेह-यावर येणा-या सुरकुत्या ही महिलांसाठी मोठी समस्या झाली आहे. सुरकुत्या लपवण्यासाठी अनेक प्रसाधने बाजारात सध्या उपलब्ध झाली आहेत. तसेच, याकरिता काही क्रीमसुद्धा मिळतात. पण यांचा कितपत फायदा होतो हे काही सांगता येत नाही. मात्र, आता सुरकुत्या जाऊन तरुण दिसण्यास मदत करणा-या गोळ्यांचा शोध लावल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या गोळ्या अधिक सुलभ असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
औषधी वनस्पती, जीवनसत्वांचा या गोळ्यामध्ये समावेश आहे. जर्मनीतील एका चिकित्सालयात याचे संशोधन करण्यात आले आहे. वनस्पती आणि जीवसत्वांपासून बनलेल्या या गोळ्यांमुळे १० टक्के सुरकुत्या कमी झाल्याचे संशोधनात आढळले. या परीक्षणाकरिता ५५ वर्षीय महिलेची निवड करण्यात आली होती. परीक्षणाअंती १४ आठवड्यांनंतर या महिलेच्या चेह-यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा तजेलवाणा झाल्याचे आढळले. द संडे टाइम्सने याबाबतची माहिती दिली आहे.