अन्नपदार्थातील काही पोषकद्रव्यांमुळे स्किझोफ्रेनियासारख्या आजाराची मानसिक लक्षणे कमी होत असल्याचा दावा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात करण्यात आला आहे.

मात्र उपचाराच्या सुरुवातीला योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये, मानसिक आजार असलेल्या तरुणाला अधिक प्रमाणात पूरक पोषक आहार दिल्यास त्यांच्यावर प्रभावी उपचार होत असल्याचे आढळून आले.

संशोधकांनी यासाठी स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झालेल्या ४५७ तरुणांची विविध पातळीवर तपासणी केली. त्यांना पूरक पोषकद्रव्ये असलेला आहार विविध टप्प्यांवर देण्यात आला. यात देण्यात आलेला विशिष्ट पूरक पोषण आहार हा मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करत असल्याचे संशोधकांना दिसून आले.

मानसिक आजाराच्या उपचारांमध्ये पूरक पोषण आहार पुरवणे हे उपहासाने घेतले जाते, असे जोसेफ फर्थ यांनी सांगितले.

मानसिक आजाराच्या सुरुवातीला पुरेसा पोषकद्रव्ये असलेला आहार घेणे फायदेशीर आहे.

यासाठी आहे त्या उपचार पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. मात्र अतिरिक्त उपचार म्हणून काही रुग्णांसाठीही उपयुक्त असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.