पॉर्न वेबसाईट्सवरील बंदी सरकारने उठवली असली, तरी या साईट्स वारंवार पाहणे कोणत्याही व्यक्तीसाठी धोकादायकच असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वारंवार पॉर्न साईट्स पाहणारी व्यक्ती त्याची व्यसनाधीन बनते आणि त्याचा व्यक्तीच्या वर्तणुकीवर आणि नातेसंबंधांवरही विपरित परिणाम होतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारताचा विचार केल्यास इंटरनेटवर पॉर्न साईट्स पाहण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढते आहे. आतापर्यंत पुरुषांचे प्रमाण जास्त होते. मात्र, आता महिलाही पुरुषांच्या बरोबरीने पॉर्न साईट्स बघतात, हे संशोधनावरून स्पष्ट झाले आहे. न्यूयॉर्कममधील एका वेबसाईटने यासंदर्भात संशोधन केले.
नवी दिल्लीतील बीएलके सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनिष जैन म्हणाले, वारंवार पॉर्न साईट्स पाहण्याने व्यक्ती त्याची व्यसनाधीन बनते. त्यामुळे त्यांचे या प्रकारच्या साईट्सवरील अवलंबित्वही वाढते. त्याचा परिणाम स्त्री-पुरुषांमधील नातेसंबंधांवर होतो आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
पॉर्न साईट्स वारंवार बघण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यात विविध प्रश्न निर्माण होऊ शकतात. दाम्पत्यामधील ताणतणावही वाढू शकतो, असे मत डॉ. समीर मल्होत्रा यांनी व्यक्त केले.