इमेलचा वापर हा आताच्या जमान्यात फार सहज गोष्ट झाली आहे. त्यातच इंटरनेट स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्याने तर बघायलाच नको. पण या इमेलची हाताळणी कार्यालयात योग्य प्रकारे झाली नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम होतात असे मत वैज्ञानिकांनी संशोधनाअंती व्यक्त केले आहे. कर्मचारी हे नेहमी इमेल तपासत असतात व त्यामुळे त्यांच्या व सहकाऱ्याच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो असे लंडनच्या किंगस्टन विद्यापीठात झालेल्या संशोधनात म्हटले आहे. व्यावसायिकता मानसशास्त्रज्ञ डॉ. एम्मा रसेल यांनी सांगितले की, नेहमी इमेल बघत राहिल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्याचे सात घातक परिणाम आहेत.एकतर पिंगपाँग म्हणजे कंपनीत काम करताना काही मेल सतत येत राहतात व त्यांची साखळी तयार होते. त्यामुळे तासन् तास ते बघण्यात जातात. काही इमेलकडे दुर्लक्ष करणे, काहीवेळा जास्त काळ थांबून इमेल करीत राहणे, इमेल वाचणे, इमेल अ‍ॅलर्टला उत्तर व स्वयंचलिक उत्तरे असे अनेक प्रकार यात असतात. काही लोक रोज एकदा ऑनलाईन जाऊन इमेल पाहतात व लगेच त्यांना उत्तरे देतात. आता ब्रॉडबँड  व थ्री जी मुळे अनेक संदेश स्मार्टफोनवर दिवसरात्र येत असतात पण अशा स्थितीत आपले वर्तन कसे असावे याची माहिती आपल्याला नसते. इमेलना जास्त वेळ थांबून उत्तरे दिल्याने काहीवेळा तो कर्मचारी जास्त काळजी घेत आहे असे वाटले तरी तो स्वीच ऑफ करू न शकल्याने त्याच्यावर ताण येऊ शकतो. कर्मचाऱ्यांना सतत सतर्क रहावे लागते, अनेकांना आपल्या कॉलला प्रतिसाद मिळालाच पाहिजे अशी सवय लागते. काही इमेलच्या इतके आहारी जातात की, त्यांना फोन व्हायब्रेट झाल्याचा भास होतो, इमेलच्या ब्लीपचा आवाज येतो व प्रत्यक्षात त्यांना संदेश किंवा इमेल आलेला नसतो. याला फँटम अ‍ॅलर्ट स्थिती म्हणतात. काही जण तर डेस्कवर नसतानाही स्मार्टफोन हातात घेऊन बसतात व लगेच इमेल संपर्काच्या पवित्र्यात असतात. २८ इमेल वापरकर्त्यांची सवयी लक्षात घेता त्यांच्यात काही सकारात्मक व नकारात्मक परिणाम दिसून आले. स्मार्टफोनवर इमेलचा वापर माफक प्रमाणात केल्यास नकारात्मक परिणाम होत नाही. काहीवेळा काही जण इमेल स्वीकारणाऱ्यापेक्षा पाठवणाऱ्यासाठी समस्या निर्माण करतात, त्यात ते जे काम करीत आहेत त्यावर त्यांचे नियंत्रण राहत नाही. इमेल अ‍ॅलर्ट्स स्वीच ऑन असताना इमेलला तातडीने उत्तर दिल्याने सकारात्मक परिणाम तेव्हाच होतात जेव्हा एखादी व्यक्ती उत्तर देताना दुसऱ्याबाबत काळजीची भावना व्यक्त करीत असते. जेव्हा इमेलमुळे ठरवलेल्या कामातील लक्ष उडते व जीवनातील सौख्य समाधानाची भावना हरवते तेव्हा मात्र त्याचे वाईट परिणाम होतात, असे रसेल यांनी म्हटले आहे.