khalil-450माझी कला ही रस्तावरचे प्रदर्शन नसून, माझ्या कुटुंबाला सांभाळण्याचे एक साधन आहे… हे शब्द आहेत दिल्लीतील रस्त्याच्या कडेला बसून एकाग्र चित्ताने आपल्या कामात रमलेल्या शिडशिडीत शरिरयष्टीच्या एका कष्टाळू तरुणाचे. तो साकारत असलेली ही पारंपरिक कला हल्ली अभावानेच दृष्टीस पडते. एस. के. खलील नावाचा हा तरुण परिसरातील लोकांकडून त्यांना नको असलेले सामान विकत घेण्याचा व्यवसाय करतो. ज्यामध्ये तांबं, पितळ किंवा अॅल्युमिनियम अशा धातुंचा समावेश असतो. या धातुंना वितळवून त्याच्याजवळील साच्याच्या मदतीने तो देवी-देवतांच्या सुंदर मूर्ती साकारतो. एक लाकडी चौकट, थोडीशी ओलसर माती आणि लोकांकडून गोळा करून आणलेले न वापरातील सामान हेच काय ते त्याच्या जीवन जगण्याचा सहारा. आपल्या कलेचा मान राखणाऱ्या आणि आपले सर्वस्व केवळ याच कामासाठी अर्पण केलेल्या या कलाकाराला जगण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचा विचारसुद्धा मनाला शिवत नाही. विविध देवी-देवतांचे साचे, ओलसर माती आणि धातू इत्यादींचा वापर करून सुदंर मूर्ती साकारण्याचे रस्त्याच्या कडेला चाललेले खलीलचे हे काम उपस्थित दंग होऊन पाहतात. माती मळण्यापासून सुरु झालेला मूर्ती साकारण्याच्या प्रवासातील दुसऱ्या टप्प्यात वितळलेले धातूचे मिश्रण साच्यात ओतण्यात येऊन अंतिम टप्प्यात धातूंची सुंदर मुर्ती साकारली जाते. परिसरातील लोक त्यांना नको असलेल्या अनेक गोष्टी खलीलला देतात. ज्यात प्रेशर कुकर, सिलिंग फॅनची पाती, अॅल्युमिनियम क्रॅंक आणि दरवाजाचे हिंजिंस इत्यादीचा समावेश आहे. या सर्व वस्तूंना परमेश्वराच्या आकारात ढाळून त्यांचे जणू तो सोनेच करतो.
artist-450भारतातील बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ इत्यादी अनेक राज्यांतून खलीलने वास्तव्य केले असून, तो नेपाळलासुद्धा जाऊन आला आहे. नेपाळी लोकांना त्याच्या कलेत आणि कामात कसा रस होता, याची आठवण कथन करताना भारतीयांप्रमाणे नेपाळी लोकसुद्धा कलेची आणि कलाकाराची कदर करत असल्याचे तो न विसरता सांगतो. खलीलचे आजोबा भांड्यांना कल्हई लावण्याचे काम करीत असत. परंतु, देवांच्या मूर्ती साकारण्याची कला त्याच्या वडिलांच्या पिढीपासून आत्मसात करण्यात आली. तेव्हापासून कुटुंबातील भाऊबंद, मित्रपरिवार आणि नातेवाईक असे जवळजवळ तीनशे जण भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन देवांच्या मूर्ती साकारण्याच्या कामातून चरितार्थ चालवत आहेत.
artist2-450लोक मोठमोठ्या शोरुममध्ये जाऊन ७०० ते १००० रुपये खर्च करून देवी-देवतांच्या मूर्ती विकत घेतात. परंतु, त्याच देवी-देवतांच्या मूर्ती खलील केवळ ८० (अॅल्युमिनियम) आणि १६० (पितळ) रुपयांना देऊ करत असला, तरी त्याला फार अल्प प्रतिसाद मिळतो, हे या गुणी कलाकाराच दु:ख आहे. मूर्तीमागे तो फार काही नफा कमवत नाही, मूर्तीच्या एकूण किमतीत केवळ २० रुपये इतकीच काय ती त्याची बिदागी असते. दिल्लीनंतर खलीलचा पुढचा पडाव कुठे असेल, याचा ठावठिकाणा नाही. या कुशल कारागिराचे कधीकधी अनेक आठवडे बिनाकामाचे जातात.

पाहा : खलील कशाप्रकारे देवतांच्या मूर्ती साकारतो त्याचा व्हिडिओ…