ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू झाल्यापासून कंपनीने नवीन विक्रम गाठला आहे. ओलाने फक्त दोन दिवसात ११०० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने कंपनीला नुकतीच त्यांची विक्री  थांबवावी लागली आहे. ओला इलेक्ट्रिकने बुधवारी सकाळी आपल्या एस १ श्रेणीच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ग्राहकांसाठी ऑनलाइन विक्रीला सुरुवात केली होती. पहिल्या एका दिवसात ६०० कोटींची विक्री पूर्ण केल्यानंतर कंपनीने दुसऱ्या दिवशी ५०० कोटींच्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. कंपनीची दोन दिवसांची विक्री ११०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

कंपनीने नुकतीच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री थांबवली आहे पण दिवाळीमध्ये १ नोव्हेंबरला पुन्हा एकदा विक्री सुरू होईल. यावर्षी दिवाळीचा ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ओला इलेक्ट्रिकने ओला एस १ आणि ओला एस १ प्रो प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. दोन्ही प्रकारांमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी असतील आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने हाताळली जाईल. ओला इलेक्ट्रिक स्कूटर १० रंगांमध्ये उपलब्ध आहेत आणि भारतातील १,००० शहरांमध्ये ओलाद्वारे थेट वितरित केल्या जातील.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस१ आणि एस१ प्रो या दोन प्रकारांमध्ये येते. ओला एस१ ची किंमत ९९,९९९ रुपये आहे आणि ओला एस१ प्रो व्हेरिएंटची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. ग्राहक विक्रीच्या दिवशी किमान २०,००० रुपयांची बुकिंग रक्कम देऊन स्कूटर ऑनलाईन बुक करू शकतात. जर तुम्ही एखादी खरेदी चुकवली असेल, तर तुम्ही पुढील स्कूटरसाठी ४९९ रुपयांमध्ये ऑनलाईन बुक करू शकता.

१८१ किलोमीटरची श्रेणी

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे एस १ व्हेरिएंट पूर्ण चार्जवर १२१ किलोमीटरची रेंज देते. तर एस १ प्रो व्हेरिएंट एकाच चार्जवर १८१ किमी चालते. एस १ व्हेरिएंट ३.६ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितासाचा वेग देते, तर एस १ प्रो व्हेरिएंट ३ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितास वेग देते.