कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात ‘सेल्फ ड्रायव्हिंग’ या नव्या सेवेची घोषणा केली आहे. ‘सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग’ या सेवेअंतर्गत ग्राहक ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने घेऊ शकतात. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल. ‘द क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार याच महिन्यात बेंगळुरूमधून या सेवेला सुरूवात होतेय.

कंपनीकडून सर्वप्रथम ही सेवा बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांमध्ये सेवा सुरू केली जाईल. कंपनीच्या बेंगळुरुतील मुख्यालयात याबाबत माहिती देण्यात आली. २०२० पर्यंत या सेवेअंतर्गत २० हजार कार होस्ट करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. भारतात सर्वाधिक ग्राहक आमच्याकडे असून २० कोटींहून अधिक सब्सक्राइबर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या सेवेसाठी ओला  App वर ‘ओला ड्राइव्ह’ नावाची एक नवी श्रेणी दिसेल. किलोमीटर किंवा दोन तासांच्या आधारे ग्राहक कारचं रेंटल(भाडं) पॅकेज ठरवू शकतात. सध्या ही सेवा केवळ बेंगळुरूमध्येच सुरू झाली असली तरी लवकरच मुंबईतही या सेवेला सुरूवात होणार आहे.

गेल्याच महिन्यात ओला कंपनीने २०१६ साली लाँच केलेल्या आपल्या बाइक सर्व्हिसच्या विस्ताराचीही घोषणा केली होती.