अ‍ॅप आधारित कॅब सेवा पुरवणारी देशातील आघाडीची कंपनी Ola आता तामिळनाडूमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी स्थापन करणार आहे. याबाबत कंपनीने तामिळनाडू राज्य सरकारशी करार केला असून हा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना असेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना उभारण्यासाठी कंपनीकडून 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कारखाना सुरू झाल्यानंतर देशातील किमान 10 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा दावाही कंपनीने केला आहे. सुरुवातीला या कारखान्यामध्ये वर्षाकाठी 20 लाख वाहनं निर्माण केली जातील, नंतर वाहन निर्माण क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात कारखान्याचं काम पूर्ण होईल आणि कामाला सुरूवात होईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

या गुंतवणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नात योगदान देण्याचा प्रयत्न आहे, असं ओलाने निवेदनामध्ये म्हटलं आहे. या कारखान्याद्वारे भारतासह युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर देशांच्या मागणीची पूर्तता केली जाईल, असंही ओलाकडून सांगण्यात आलं. ई-स्कूटर मार्केटमध्ये ओला कंपनीची बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, हीरो इलेक्ट्रीक (हीरो इलेक्ट्रीक) आदी कंपन्यांशी स्पर्धा असणार आहे. या कंपन्या आधीपासूनच भारतात इलेक्ट्रीक वाहनाची विक्री करत आहेत.