11 December 2017

News Flash

चष्मा असलेल्या आजी-आजोबांनो, ‘ही’ काळजी घ्यायलाच हवी…

दुर्लक्ष करणे हानिकारक

विद्युत राजहंस, नेत्रतंत्रज्ज्ञ | Updated: June 18, 2017 4:41 PM

वय वाढत जाते तसे इतर अवयवांप्रमाणे डोळेही थकतात. हळूहळू दृष्टी मंदावत जाते. शब्दांच्या आधी संवाद साधणारे डोळे साथ देईनासे होतात, शुष्क पडतात. आणि मग बाह्य जगाशी असलेले नाते तुटायला लागते. यामुळे एकाकीपण आणि चिडचिड वाढते. नेत्रचिकित्सा करून कधीकधी मंदावलेली दृष्टी परत मिळतेही. बऱ्याचदा निदान आणि उपचार वेळेवर न मिळाल्याने मंद झालेली दृष्टी कायमची अधू होऊन बसते. मग परावलंबित्व वाढते. इतके सगळे होण्यासाठी ‘कारण’ असलेली दृष्टी कमी व्हायची कारणे तरी काय आहेत ते आज जाणून घेऊयात.
१. वृद्धत्व आणि मोतीबिंदू हे समीकरण बहुतेक सर्वांच्या परिचयाचे आहे. वयोमानाबरोबरच अतिनील किरणांचा मारा, असंतुलित आणि निसत्व आहार, डोळ्याची योग्य प्रकारे काळजी न घेणे इत्यादी गोष्टी मोतीबिंदूसाठी कारणीभूत ठरतात.

२. मोतीबिंदुसारखीच दृष्टी कमी करणारा दुसरा आजार म्हणजे काचबिंदू. ह्याला दृष्टीचा ‘छुपा कातील’ म्हणूनही ओळखतात. कोणत्याही प्रकारचे लक्षण न दाखवता हा काचबिंदू संपूर्ण नजर मारून टाकतो. डोळ्याच्या आतील दाब वाढला कि त्याचा ताण प्रकाशाची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणाऱ्या मज्जातंतुंना झेपत नाही. हळूहळू ते कमकुवत होऊन मरून जातात. वर्षानुवर्षे कोणत्याही प्रकारची दुखण्या-खुपण्याची जाणीवही न होता, डोळ्याची संपूर्ण दृष्टी कायमची जाते. दुर्दैवाने अजूनही काचबिंदुमुळे गेलेली दृष्टी परत मिळवणारा उपचार सापडलेला नाही. मात्र शाबूत असलेली दृष्टी वाचवण्याचे आणि जपण्याचे उपचार मात्र आहेत. गरज आहे ती, ४० वयाच्या पुढच्या प्रत्येकाने जाणीवपूर्वक दरवर्षी आपल्या डोळ्यांची तपासणी विशेषतः डोळ्याच्या आतील दाबाची तपासणी नियमितपणे करून घेण्याची!

३. असाच दृष्टी कमी करणारा अजून एक आजार म्हणजे वयोपरत्वे होणारी दृष्टीपटलाची विशेषतः दृष्टीकेंद्राची झीज. अतिनील आणि इन्फ्रारेड किरणांमुळे नेत्रपटलाचे आयुष्यभर अपरिमित नुकसान होत असते. वर्षानुवर्षे ऱ्हास होत असतो. एका विशिष्ट टप्प्यावर अचानक दृष्टी मंद झाल्याची जाणीव होते. तपासणी अंती समजते कि ARMD म्हणजे दृष्टीकेंद्राची झीज झाली आहे. दृष्टीपटलावरच्या पेशी प्रकाशाचे रूपांतरण विद्युतीय तरंगांमध्ये करू शकत नाहीयेत. त्यामुळे अस्पष्ट, अंधुक, वेडेवाकडे, ओबड-धोबड दिसते आहे. यावर वैद्यकीय जगतातही पुरेसे उपचार नाहीत.

४. आजच्या धावपळीच्या जीवनात घरटी किमान एकाला तरी डायबेटीस, ब्लड प्रेशर, थायरोईड, संधिवात अशा विविध व्याधींनी जखडले आहे. ह्या सर्व शारीरिक व्याधींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर आणि परिणामी दृष्टीवर होत असतो. वारंवार चष्म्याचा नंबर बदलण्यापासून ते संपूर्ण दृष्टी अधू होईपर्यंत विविध प्रकारांनी हा परिणाम दिसतो. वेळीच सावध व्हायला हवे. कारण दृष्टीची हानी टाळण्यासाठी थोडेफार उपचार आहेत. पण गेलेली दृष्टी परत आणणे आजच्या वैद्यकीय उपचारांच्या कक्षेच्या बाहेर आहे.

चांगल्या दृष्टीसाठी प्रतिबंधात्मक उपाय?

जेष्ठ नागरिक आणि त्यांचा चष्मा याविषयी लिहावे तेवढे कमीच आहे. कधी टेबलवर, कधी कपाटावर; कधी बाथरूममध्ये तर कधी स्वयंपाकगृहात, कधी आरश्यासमोर, कधी बागेतल्या झोपाळ्यावर तरी कधी चक्क स्वतःच्या डोक्यावर हा चष्मा ‘हरवलेला’ असतो. मग घरभर शोधाशोध चालू होते. नवीन चष्मा बनवणे किंवा जुना दुरुस्त करणे याला काही दिवसांचा अवधी नक्कीच लागतो. मग चिडचिड होते.

१. दुकानदाराला लवकरात लवकर चष्मा बनवून दे अशी घाई केल्याने दुकानदारही बऱ्याचदा क्वालिटीकडे न बघता मिळतील त्या काचा बसवून देतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य अजूनच अडचणीत येते.

२. काही जेष्ठ नागरिक तर वर्षानुवर्षे एकाच चष्मा चालवतात आणि त्यात भूषण मानतात.

३. चष्मा डोळ्यासमोर, नाकावर नीट बसतोय का नाही ह्याकडेही बहुतेकांचे लक्ष नसते. गंजलेला, वाकडा, सैल, खाली घसरणारा चष्मा वय झालेल्या, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या त्वचेलाही तितकाच अपायकारक असतो.

४. आपल्याकडे कपड्यांच्या किंवा चपलांच्या अनेक जोडी असतात, तसेच किमान दोन चष्मे असायला काय हरकत आहे? दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घेऊन, योग्य नंबरचा आणि योग्य पद्धतीने बनवलेला चष्मा ही आपल्या सशक्त दृष्टीसाठी केलेली एक गुंतवणूक आहे. एक नवीन चष्मा बनवताना, जुन्या चष्म्यात नवीन नंबरच्या साध्या काचा बसवून घेतल्या तरी अडचणीच्या वेळी वापरायला एक पर्याय उपलब्ध राहतो.

विद्युत राजहंस, नेत्रतंत्रज्ज्ञ

First Published on June 18, 2017 4:41 pm

Web Title: old age people should take care of their eyes