माशांमधून मिळणारे ओमेगा ३ अ‍ॅसिड हे जवस व इतर पदार्थातील तेलात असणाऱ्या ओमेगा ३ आम्लांपेक्षा जास्त प्रभावशाली असतात त्यामुळे कर्करोगापासून बचाव करता येतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. सागरी माशातील ओमेगा ३ आम्ले ही आठपट प्रभावी असतात त्यामुळे कर्करोगाच्या गाठीची वाढ रोखली जाते. वनस्पतीतील ओमेगा ३ आम्ले व सागरी माशातील ओमेगा ३ आम्ले यांची तुलना प्रथमच करण्यात आली असून यात माशातील आम्ले ही स्तनाच्या कर्करोगावर प्रभावी असतात असे दिसून आले असल्याची माहिती कॅनडातील गुलेफ विद्यापीठाचे डेव्हिड मा यांनी दिली.

वनस्पती व मासे यांच्यातील ओमेगा तीन आम्ले ही कर्करोगाला विरोध करतात हे आधीच स्पष्ट झालेले आहे, पण त्यातील कुठले अन्नघटक चांगले याचे उत्तर मासे असे देता येईल. ओमेगा तीन मेदाम्लांचे लिनोलेइक, एकोसॅपेनटॅनॉइक, डोकोसॅहेक्साइनोइक हे प्रकार आहेत. यातील लिनोलेइक आम्ल सोयाबीन, कॅनोला, जवस तेल यात असते, तर ईपीए व डीपीए ही मेदाम्ले सागरी मासे, शेवाळ, फायटोप्लँक्टन यात असतात. हा शोधनिबंध न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

एचईआर दोन हा सगळ्यात आक्रमक असा स्तनाचा कर्करोग असतो त्यात उंदरांवर करण्यात आलेल्या मेदाम्लांच्या प्रयोगात सागरी जीवातील मेदाम्ले जास्त प्रभावी दिसून आली आहेत. कर्करोग होण्यापूर्वीही ओमेगा मेदाम्ले जास्त चांगले काम करतात. ती स्तनातील कर्करोगाची गाठ रोखतात. त्यामुळे गाठीचा आकार सागरी माशांमुळे ६० ते ७० टक्के कमी होतो.

गाठींची संख्या तीस टक्के कमी होते. त्यामुळे आठवडय़ाला दोन ते तीन वेळा मासे खाण्याने चांगला फायदा होऊ शकतो, असे मा यांचे म्हणणे आहे.