फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टाग्राम (Instagram) या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मच्या युजर्सना लवकरच झटका मिळण्याची शक्यता आहे. कारण कंपनी लवकरच रीशेअर (Reshare) हा पर्याय हटवण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. टेस्टिंगदरम्यान कंपनीने हे फिचर प्लॅटफॉर्मवरुन ‘डिसेबल’ केल्याचं वृत्त आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, इंस्टाग्रामने टेस्टिंगदरम्यान रीशेअर (Reshare) हा पर्याय हटवल्याचं समजतंय. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या फीडच्या स्टोरीवर शेअर करता येणार नाही. फीड पोस्टमध्ये युजर्सना कमी पोस्ट बघायला आवडतात असा अभिप्राय मिळाल्यानंतर कंपनीने ही टेस्टिंग सुरू केली आहे. कोणत्या देशांमध्ये ही टेस्टिंग सुरू आहे किंवा किती दिवसांपर्यंत टेस्टिंग सुरू असेल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.

दरम्यान, अलिकडेच कंपनीने एक नवीन फिचर लाँच केलं आहे. या नव्या फिचरमुळे आता Instagram वरील डिलिट झालेल्या पोस्ट देखील बघता आणि परत मिळवता येणार आहेत. Instagram चं हे नवीन फिचर कंपनीकडून रोलआउट करण्यास सुरूवात झाली आहे. एका ब्लॉगपोस्टद्वारे कंपनीने या फिचरची माहिती दिली. या फिचरद्वारे 30 दिवसांमधील जुन्या डिलीट झालेल्या पोस्ट री-स्टोअर करता येतील. डिलिट पोस्ट री-स्टोअर करण्याचा पर्याय Instagram च्या सेटिंग्समध्ये मिळेल. हे फिचर फोटो, व्हिडिओ, रील्स आणि IGTV व्हिडिओ सर्वांसाठी काम करेल.  विशेष म्हणजे नव्या अपडेटनंतर युजर्स त्यांच्या स्टोरीजही री-स्टोअर करु शकतील. पण स्टोरीज ३० दिवस नव्हे तर केवळ २४ तासांमध्येच री-स्टोअर करता येईल. नवीन अपडेटनंतर इंस्टाग्राम अकाउंटवरुन डिलिट केलेले फोटो, व्हिडिओ, रील्स आणि IGTV व्हिडिओ टाइमलाइनवरुन कायमस्वरुपी डिलिट होतील. पण, कंपनी हा डाटा ‘रिसेंटली डिलिटेड फोल्डर’मध्ये ठेवेल. इथून तुम्ही ३० दिवसांमध्ये हा डाटा री-स्टोअर करु शकतात. तुम्हालाही इंस्टाग्रामचं हे पिचर वापरायचं असल्यास सर्वप्रथम अ‍ॅप अपडेट करावं लागेल. त्यानंतर अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘रिसेंटली डिलीटेड’ पर्यायावर टॅप करावं लागेल.