ऑफीसमध्ये बसून काम आहे? एकाच जागी बसून काम केल्यामुळे काही वेळानंतर पाठ भरुन आल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं. काम तर सोडू शकत नाही. मग यावर नेमका उपाय तरी काय?
ज्यांचं काम हे एकाच जागी बसून असतं त्यांनी दिवसातून एक तास तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. जे नियमित व्यायाम करत नाहीत आणि त्यातही ऑफीसमध्ये बसून कामं असतात त्यांना त्यांच्या वयापेक्षा लवकर मृत्यू येतो हे सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण पैशांच्या मागे धावताना दिसतो, त्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांना सहज बळी पडतो. या सगळ्या आजारांना बळी पडायचं नसेल तर शरीराच्या गरजांकडेही लक्षं देणं तेवढंच आवश्यक आहे.
शरीराला व्यायामाची सवय नसल्यामुळे वर्षाला ५३ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. धुम्रपानाने मृत पावणाऱ्या व्यक्तींपेक्षा हा आकडा मोठा आहे. अमेरिकेतील आरोग्य केंद्राच्या संशोधनानुसार, आठवड्याला स्नायू बळकट करण्याच्या व्यायामांबरोबरच १५० मिनिटांचं अॅरोबिक्स किंवा तशा प्रकराचे शरिराची हालचाल होणारे व्यायाम केले तर हृदय विकाराचं प्रमाण कमी होतं.
अनेकदा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना एका जागवेरुन फार वेळासाठी उठता येत नाही. ऑफिसनंतरही वेळ नाही अशी कारणं देतात. पण ही कारणं तुमच्या जीवावरही बेतू शकतात याकडे लक्षं द्या. दुपारच्या जेवणानंतर १५ मिनिटांचं चालणं, सकाळी चालायला जाणं, ऑफिसला जाताना सायकलने जाणं अशा साध्या गोष्टींनीही तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा व्यायाम करण्यापेक्षा दररोज नियमित व्यायाम केला तर शरीरालाही त्याची सवय होते.
अमेरिकेत काही माणसांच्या नियमित व्यायाम करण्यावर संशोधन करण्यात आले. यात पाच मिनिटांच्या व्यायामापासून ते ६० ते ७५ मिनिटांच्या व्यायामापर्यंतची नोंद करण्यात आली.
जे ऑफिसमध्ये आठ तासांचं काम करतात पण व्यायामासाठीही त्यांना वेगळा वेळ देता येतो त्यांचे आयुष्यमान चांगले राहते हे सिद्ध झाले आहे. पण तेच जर आठ तासांपेक्षाही कमी तास ऑफिसमध्ये बसून काम करतात पण व्यायाम करत नाहीत. ते अनेक व्याधींनी त्रस्त झाल्याचे दिसण्यात आले आहे. तुम्हाला आवडत असलेला कोणताही मैदानी खेळ तुम्ही काही मिनिटांसाठी किंवा तासांसाठी खेळलात तर व्यायामाएवढाच किंबहूना त्याहून जास्त फायदा होतो.