लंडन : तरुण वयातील जवळपास एक चतुर्थाश व्यक्ती या त्यांच्या स्मार्टफोनवर इतक्या अवलंबून आहेत, की हा फोन उपलब्ध न झाल्यास त्या चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ होतात, असे जागतिक स्तरावर झालेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे.

२०११ मध्ये स्मार्टफोनचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाल्यापासून प्रसिद्ध झालेली माहिती विविध प्रकारच्या अभ्यास अहवालांतून असे दिसून आले आहे की, १० ते ३० टक्के मुले आणि तरुणांकडून स्मार्टफोनचा वापर हा अयोग्यरीत्या केला जातो. याचाच अर्थ मुले आणि तरुणांपैकी सरासरी २३ टक्के व्यक्तींमध्ये स्मार्टफोनचा वापर हा त्यांच्यामध्ये समस्या निर्माण करू शकेल, अशा चुकीच्या पद्धतीने (प्रॉब्लेमॅटिक स्मार्टफोन युसेज किंवा पीएसयू) झाल्याचे दिसून येते, असे इंग्लंडमधील किंग्ज कॉलेज (लंडन) च्या संशोधकांनी म्हटले आहे. स्मार्टफोनच्या संबंधात एखाद्या व्यक्तीचे वर्तन हे त्या फोनचे व्यसन जडल्यासारखे असणे किंवा स्मार्टफोन उपलब्ध होत नसल्यास त्या व्यक्तीमध्ये घबराट निर्माण होणे किंवा नाराजीची भावना निर्माण होणे हे अशा समस्याजन्य स्मार्टफोन वापराचे लक्षण आहे. स्मार्टफोनच्या वापराच्या बाबतीत अयोग्य सवयी जडलेल्या अशा व्यक्तींना फोनचा वापर करताना वेळेचे भान राहात नाही. किंबहुना स्मार्टफोन वापराची वेळ मर्यादित ठेवणे त्यांना जमत नाही. स्मार्टफोनपासून लांब राहणे कठीण झाल्याने त्यांना आनंद देणाऱ्या इतर गोष्टींपासून ते वंचित राहतात.

जगभरात झालेल्या एकूण ४१ पाहण्यांच्या विश्लेषणातून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्याबद्दलची माहिती ‘बीएमसी सायकिआट्रि’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे. स्मार्टफोनचा वापर कशा प्रकारे होतो, याचा त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याशी तसेच निराशा, ताण आणि झोपचे प्रमाण यांच्याशी संबंध असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे.