तुम्ही चायनीज वनप्लस कंपनीचा स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी नक्कीच वाचा. ही कंपनी ग्राहकांच्या कोणत्याही परवानगीशिवाय ग्राहकांच्या फोनमधील डेटा गोळा करण्याचे काम करत आहे. इतकेच नाही हा डेटा गोळा केल्यानंतर कंपनी आपल्या सर्व्हर स्टेशनमध्ये तो पाठविण्याचे काम करत आहे. सिक्युरीटी रिसर्चर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ख्रिस्तोफर मूर यांनी हा आरोप केला आहे.

फोनचा आएमईआय क्रमांक, फोन क्रमांक, मोबाईल नेटवर्कचे नाव, फोनचा सिरीयल क्रमांक आणि वायरलेस नेटवर्क यांचा समावेश आहे. आपण अशाप्रकारे ग्राहकांचा डेटा गोळा करत असल्याचे कंपनीने मान्यही केले आहे. मात्र, ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सुविधा देण्यासाठी हे केले जात असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. यामुळे सॉफ्टवेअरची कार्यक्षमता वाढेल, असा दावा कंपनीने केला आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअरची निर्मिती करणे आणि ग्राहकांना चांगला सेल्स सपोर्ट देण्यासाठी आपण असे करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीने अशाप्रकारे माहिती गोळा करणे बंद करावे, असे आपण कंपनीला कळवल्याचे मूर यांनी म्हटले. मूर यांनी आपल्या इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्सचे रेकॉर्ड ठेवल्यावर या कामासाठी ऑक्सिजन ओएस कंपनीचे सॉफ्टवेअर वापरण्यात येत असल्याचे त्याला समजले. वनप्लस फोन वापरणारी व्यक्ती कधी कोणते अॅप उघडते आणि ते किती वेळासाठी वापरते याचीही नोंद कंपनी ठेवत असल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. कंपनीवर अशाप्रकारे डेटा गोळा करण्याचा आरोप पहिल्यांदाच झाला नाही. तर याआधीही अशाप्रकारे ग्राहाकांचा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.